गिरणारे : गिरणारे परिसरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कमरेवर आणण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविल्या व जलशिवारातील पाणी अडवून कृत्रिमरीत्या पाणवठे निर्माण करण्यासाठी कोट्यवधी निधी खर्च केला; परंतु ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी होणारी वणवण आजही कायम असून, काही गावांना पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.नाशिक तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साप्ते, रोहिले, लव्हाळीपाडा, हिरडी, पिंपरी, माळेगाव, गणेशगाव या वाड्या-वस्त्यांमध्ये मार्चपासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. आदिवासी व महिलावर्ग रात्रंदिवस पाण्यासाठी भटकत आहेत. या भटकंतीमुळे व सध्या वाढत असलेल्या उन्हाच्या दाहकतेमुळे ग्रामीण भागात आजाराचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दोन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढूनही उन्हाळा येताच डोंगरमाथ्यासह सखल भूभागातदेखील पाण्यासाठी दाहीदिशा होत असलेली भटकंती अद्याप दूर झालेली नाही. शासन यंत्रणा मात्र टंचाई नसल्याचे चित्र रंगवीत आहे. जलयुक्त शिवार योजनेचे यश दाखविण्यासाठी टँकरचे प्रस्ताव अटी-शर्तींच्या नावाने फेटाळले जात आहेत. सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती होत असताना शासन टँकर देत नाही. दोन किमी परिसरात पाणी असल्याचे कारण पुढे करण्यात येते.बेसाल्ट खडकामुळे पाणी झिरपण्यास बाधागेल्या काही वर्षांतील नळपाणीपुरवठा योजनांचे स्रोत पूर्णत: बदलले आहे. तालुक्यातील बहुतांश भाग बेसाल्ट खडकांचा असल्याने पाणी झिरपा होत नाही. पावसाळ्यात पाणी वाहून जाते. पाणवठा असणाºया जागा कोरड्या पडल्या आहेत. यातून भविष्यातील पाण्याची असलेली भीषणता आपल्यासमोर येत आहे. जलयुक्त शिवार योजनेचे हे चौथे वर्ष आहे. यापूर्वीदेखील जलसंधारणाच्या नावाने कामे झालेली आहेत.हिरडी येथे पाणी विकत घेण्याची वेळगिरणारे जवळील हिरडी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने व पाण्याचा उद्भव नसल्याने गावातील नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यासाठी १०० रुपये टिपाड याप्रमाणे ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.
पूर्व भागात पाणी विकत घेण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:29 AM