इंदिरानगर : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरने पाण्याची गरज भागवावी लागत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरुळीत केला जात नसल्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.गेल्या काही महिन्यांपासून इंदिरानगर परिसरात पाण्याची पळवापळवी होत असून, त्यातच पाणीपुरवठा विभागाच्या व्हॉल्व्हमन व चेकर यांच्या मनमानी कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यंदा धरणांमध्ये जलसाठा मुबलक असतानाही गेल्या आठवड्यापासून आत्मविश्वास सोसायटी, देवेंद्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, शास्त्रीनगर, एलआयसी कॉलनी पाटील गार्डनसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नळास बारीक धारेने पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे पिण्याचे पाणीसुद्धा जेमतेम भरले जात असताना वापरायला पाणी आणायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत असताना महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मात्र त्याकडे कानाडोळा करीत असल्याने नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याचे खासगी टॅँकर मागवावे लागत आहे. धरणामध्ये मुबलक पाणी असतानाही टंचाईचा सामना करावा लागत असेल तर उन्हाळ्यात काय होणार? असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा येथे मुकणे धरणातून आलेल्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला कुलूप लावण्यात आले होते तेव्हा पाणीपुरवठा सुरळीत होता, परंतु कुलूप काढताच पाण्याची पळवापळवी करण्यात येत आहे. या संदर्भात प्रभाग क्रमांक ३०च्या नगरसेवकांनी प्रभाग सभेत प्रशासनाला धारेवर धरलेहोते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.महापालिकेचे सर्व कर भरूनदेखील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही मग कर भरायचा की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण की शहरात सगळीकडे पाणीपुरवठा सुरळीत असताना फक्त आमच्या परिसरात कायम पाणीप्रश्न निर्माण होत आहे.- कल्पना माळवे, स्थानिक रहिवासी