(नीलेश कदम)
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाने तळ गाठल्याने गेल्या दहा दिवसांपासून येथील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण करत भटकंती सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गतवर्षी व यावर्षी चैत्र उत्सव यात्रा कोरोना साथीच्या रोगांमुळे प्रशासनाने रद्द केल्या होत्या. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता व यात्रा नसल्या कारणाने थोड्याफार प्रमाणात पाण्याची बचत झाली. परंतु गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
----------------------------
गाळ न काढल्याने टंचाई
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी भवानी पाझर तलावाचा गाळ काढला गेला पाहिजे. परंतु तसे झाले नाही. गेल्या बऱ्याच वर्षापासून पाझर तलावातला गाळ काढला गेला नाही. मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. पाऊस पडण्यापूर्वी जर ग्रामपंचायतीने लक्ष घालून दरवर्षी गाळ काढला तर थोड्याफार प्रमाणात का होईना पाणीटंचाई दूर होईल.
----------------------------
ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष
ग्रामस्थांचा पाणी नसल्यामुळे संताप होऊ नये व समजूत काढण्यासाठी भवानी पाझर तलावाचा पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी. आपला सर्वांचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे, आपण शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळून नवीन धरणाचे काम चालू होणार आहे. सप्तशृंगगड सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशी शक्कल लढवत असा संदेश व्हाट्सॲपद्वारे गावातील ग्रुपवर पसरविण्यात येत असून ग्रामपंचायतीकडून वेळ मारून नेली जात आहे.
-------------------------
अगोदरच व्यवसाय ठप्प, त्यात टंचाई
धरणाचे काम जेव्हा चालू होईल तेव्हा होईल तोपर्यंत पाण्याचे काय नियोजन? असा संतप्त सवाल येथील महिला वर्गाकडून केला जात आहे. येथील ग्रामस्थांना तसेच वयोवृद्ध महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तसेच नाईलाजाने हजार ते १२०० रुपये देऊन टॅंकरवाल्यांकडून पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र येथे पहावयास मिळत आहे. एकीकडे कोरोना साथीच्या रोगांमुळे प्रशासनाने सर्व धार्मिक स्थळे बंद केले आहे येथील व्यवसाय बंद आहेत, पैसे आणायचे तरी कुठून, अशी अवस्था येथील ग्रामस्थांची झाली आहे.
-------------------
ट्रँकर उपलब्ध करून द्या
सप्तशृंगगड हे पावसाचे माहेरघर समजले जाते. परंतु यंदा जुलै महिना अर्धा उलटूनही गेल्याने वरुण राजाने पाठ फिरवली आहे. याची खंत ग्रामस्थ करीत आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठीची परवड थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा गडावर पाण्याचे टॅंकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
-----------------
सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलावाने तळ गाठला. (१५ गड)
150721\15nsk_6_15072021_13.jpg
१५ गड