नाशिक : कोरोनामुळे आलेल्या निर्बंधांच्या काळात घरी असणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रत्येकासाठी सध्याचा काळ हा आराम करण्याचा नसून, कौशल्ये विकसित करण्याचा असल्याचे डॉ.बोम्मादेवरा रमेश यांनी परिसंवादात सांगितले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडिज येथे ‘इंडस्ट्री संवाद’ या व्याख्यानमालेअंतर्गत ‘व्यावसायिक शैक्षणिक गती-संधी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणासमोरील आव्हाने’, तसेच ‘डेटा अॅनालिटिक्स’ या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पहिल्या कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून डॉ.रमेश बोलत होते. या अनिश्चित काळात बदलत्या बाजारपेठेवर आधारित नवीन कार्यनीती विकसित करणारे व अंमलात आणण्यास सक्षम असणाऱ्या व्यवस्थापकांची आवश्यकता असते, असेही डॉ.रमेश यांनी नमूद केले.
या व्याख्यानमालेत अमित कुऱ्हेकर यांनी जेव्हा मशीन मनुष्यांविना काही अतिविशिष्ट कामे पूर्ण करते, त्याला कृत्रिम बुद्धिमता म्हणून गणले जात असल्याचे सांगितले. व्यवसाय बुद्धिमत्ता, कृत्रिम इंटेलिजन्स, डेटा स्टॅटिक्स, प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स , कॉन्जिएटिव्ह कॉम्प्युटिंग, डीप लर्निंग, मेटा डेटा, प्रोग्रामिंग भाषा या विषयांची माहिती दिली. त्यांनी आर्थिक बाजारपेठ, वैयक्तिक वित्त आणि संपत्ती व्यवस्थापनावर मनोगत व्यक्त केले.
इन्स्टिटयूटचे अध्यक्ष राहुल वैद्य व इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ.प्रीती कुलकर्णी हे कार्यक्रमास उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे व्याख्यान पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडले.
इन्फो
विद्यार्थांनी धोरण आणि नूतनीकरण, व्यवस्थापनाची साधने आणि तंत्रज्ञान, परस्पर कौशल्ये, लवचिकता आणि अनुकूलता, तंत्रज्ञानाची माहिती, सर्जनशीलता आणि नवकल्पना प्रस्थापित करणे ही कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. अशा स्वरूपाची कौशल्ये विकसित केल्यास त्याचा त्यांना फायदाच होईल, असेही डॉ.रमेश यांनी नमूद केले.