लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा, सातबारा कोरा करावा तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे या मागणीसाठी बळीराजाने संप पुकारल्याने त्याचा परिणाम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मोलमजुरी करणाऱ्या हमाल तसेच मापाऱ्यांवर झाला आहे. बाजार समितीत शेतमाल भरणाऱ्या तसेच हमाली व्यवसाय करणाऱ्या हातावरील मोलमजुरांचा दैनंदिन रोज बुडत असल्याने अजून काही दिवस संप सुरू राहिल्यास हमालांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. बाजार समितीत शेकडो बेरोजगार तरुण हमाली व्यवसाय करतात. हमाल व्यवसायातून त्यांना दैनंदिन चारशे ते पाचशे रुपये मजुरी मिळत असते, मात्र गुरुवार (दि. १) शेतकऱ्यांनी संप पुकारल्याने बाजार समितीत दैनंदिन होणारी शेतमालाची आवक पूर्णपणे थांबलेली आहे. शेतमालच येत नसल्याने हमाली व्यवसाय थांबलेला आहे. मागील दोन दिवसांपासून बाजार समितीत हमाली व्यवसाय करणाऱ्यांच्या हाताला काम नसल्याने व त्यातच त्यांची रोजंदारी बुडत असल्याने हमाली व्यवसाय करणारे आर्थिक संकटात सापडलेले आहेत.हमाली व्यवसाय करून रोज मिळणाऱ्या रोजंदारीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांवर तर मोठे संकटच कोसळले आहे. दैनंदिन हमालीतून मिळालेल्या पैशातूनच रोज लागणारे मीठ, मीरची खरेदी करण्यासाठी इतरांकडून उधारी पैसे घेण्याची वेळ आल्याचे काही हमालांनी बोलूून दाखविले.
संपामुळे हमालांवर उपासमारीची वेळ
By admin | Published: June 03, 2017 12:26 AM