नाशिक शहर व परिसरात गुरुवारी मकरसंक्रांतीनिमित्त केवळ झोपडपट्टी व गावठाण भागात पतंगबाजीचा उत्साह दिसून आला. काही उपनगरांमधील झोपडपट्ट्यांचा भाग वगळता शहरातील मध्यवर्ती परिसरासह अन्य भागांमध्ये आकाशात पतंगांची संख्याही कमी होती. शहरात नायलॉन मांजाचा वापर काही प्रमाणात कमी झाल्याने पक्षीदेखील जखमी होण्याचे प्रमाण संक्रांतीला कमी राहिले. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ४२ पक्षी नायलॉन मांजामध्ये विविध ठिकाणी अडकले होते. त्यापैकी मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरात एकूण २८ पक्षी जखमी झाल्याची घटना घडली होती. एकूणच मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मकरसंक्रांतीच्या दिवशी पक्षी जखमी होण्याचे प्रमाण कमी राहिल्याने नाशिक शहरातील निसर्गाची मोठी हानी रोखली गेली.
नाशिककरांनी ज्याप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी संयम दाखवून नायलॉन मांजाचा स्वयंस्फूर्तीने वापर टाळला तसाच तो यापुढेही जर टाळला गेला तर नाशकात माणसांसह पक्ष्यांवरील धोका कमी होण्यास मदत होईल, असे मत पर्यावरणप्रेमी संस्थांनी व्यक्त केले. सातपूर औद्योगिक वसाहतीत एक घुबड तर सिडको, देवळाली कॅम्प, पाथर्डीफाटा या भागात दोन कबुतर, एक कोकीळ व एक गायबगळा-जखमी होण्याच्या घटना समोर आल्या. तसेच नायलॉन मांजामुळे पंख कापले गेल्याने एक घार व कबुतराला उपचारासाठी नागरिकांनी अशोकस्तंभ येथील पशुंच्या दवाखान्यात दाखल केले. तेथे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संदीप पवार यांनी त्यांच्यावर उपचार केले.
--इन्फो--
स्थलांतरित राखी बगळा गंभीर जखमी
संक्रांतीच्या दिवशी आनंदवली भागात स्थलांतरित दीड फूट उंचीच्या राखी बगळ्याचे पंख, पाय आणि चोचीला नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत झाली. ही बाब डॉ. राहुल चौधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ पक्षिमित्र अनिल माळी यांच्याशी संपर्क साधला. माळी यांनी मनपा सफाई कर्मचारी संजय सोनवणे, धनंजय मुडा यांच्या मदतीने जखमी राखी बगळ्याला रेस्क्यू केले. त्याचे पंख व चोचीसह पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर पक्षिप्रेमींनी उपचार करत गीव फाऊंडेशनेच अरुण अय्यर यांच्याकडे सोपविले. तसेच इको-एको वन्यजीवप्रेमी संस्थेचे वैभव भोगले, सागर पाटील यांनी दिवसभरात सहा जखमी पक्षी विविध ठिकाणांहून रेस्क्यू केले.
--
फोटो अर वर १४बर्ड१/२
,