पंचवटीत डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त
नाशिक : शहरातील अनेक भागांत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सायंकाळच्या वेळी नागरिकांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या धूरफवारणीच्या गाड्या काही भागांपर्यंत पोहोचत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, महापालिकेने याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमणुकीची मागणी
नाशिक : गंजमाळ परिसरात सिग्नल यंत्रणा बसविलेली असली तरी अनेक वाहनचालक सिग्नलवर वाहन न थांबविता सुसाट वेगाने निघून जातात. त्यामुळे अनेक वाहनचालकांचा गोंधळ उडतो. तसेच अनेकदा किरकोळ अपघात होऊन बाचाबाचीचे प्रसंग घडतात. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा
नाशिक : शहरातील विविध भागांत मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्यातच बसतात. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. महापालिकेचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
जुने नाशिकला धूरफवारणीची मागणी
नाशिक : जुने नाशिक परिसरात डासांचा उपद्रव वाढल्याने परिसरात धूरफवारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने आणि उघडी गटारे असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरात प्रादुर्भाव वाढला असून, रुग्णसंख्या वाढत असल्याने या भागात दर आठवड्यात धूरफवारणी करण्याची मागणी होत आहे.
बदलत्या वातावरणामुळे घसादुखी
नाशिक : वातावरणातील उकाडा एकीकडे वाढत असताना रात्रीच्या सुमारास जाणवणारी थंडी अशा विचित्र वातावरणामुळे अनेक नागरिकांना आरोग्याचे त्रास वाढले आहेत. काही नागरिकांना घसादुखीचा त्रास होऊ लागला असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे परिसरातील डॉक्टरांकडे रुग्णांची गर्दीदेखील वाढत आहे. घसादुखीबरोबरच खोकल्याचेदेखील रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्येदेखील चिंता वाढत आहे.
बेशिस्त नागरिकांवर कारवाईची मागणी
नाशिक : अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहरातील विविध रस्त्यांवर बेशिस्त वाहनचालकांची वर्दळ वाढली असल्याचे दिसून येत आहे. अनेक तरुण वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवितात. तसेच मास्कदेखील न घालता रस्त्यावरून वावरत आहेत. या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी आळा घालावा, अशी नागरिकांची मागणी आहे.