नाशिक : यंदा कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला; परंतु अनलॉकच्या टप्प्यात अन्य उद्योगधंदे पूर्ववत होत असताना, शाळा बंदमुळे स्कूलबसचा व्यवसाय अद्यापही सुरू होऊ शकला नाही. परिणामी, चालक व मालकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला असून, वाहन उभे असतानाही विविध प्रकारचा कर भरण्याची वेळ आली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. जून महिन्यापासून अनलॉकचे टप्पे सुरू झाले. त्यामुळे टप्प्याटप्याने बहुतांश उद्योग, धंदे सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे नर्सरी ते आठवीचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. त्यामुळे स्कूल बसची चाकेही जागेवरच आहेत. याचा सर्वाधिक फटका स्कूलबस चालकांना बसला आहे. कोरोनामुळे खासगी वाहनांवरदेखील चालकाचा रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा, असा पेच चालकांसमोर निर्माण झाला आहे. स्कूल बसमधून खासगी प्रवासी वाहतूकही करता येत नसल्याने स्कूलबसच्या मालकांसमोरही आर्थिक प्रश्न निर्माण झाला. लोकमत न्यूज नेटवर्क
इन्फो-
उपजीविकेसाठी पर्यायी व्यवसाय
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. अनलॉकच्या टप्प्यात अनेक उद्योगधंदे पूर्ववत झाले.
शाळा सुरू नसल्यामुळे स्कूल बसेस बंद असल्याने स्कूल बस चालक व मालकांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला. काहींनी भाजीपाला व फळ विक्रीचा पर्यायी व्यवसाय सुरू केला तर काही जणांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. काही चालकांनी अन्य वाहनावर चालक म्हणून रोजगार शोधला आहे. काही स्कूल व्हॅन, ऑटोवाल्यांनी शहरात खासगी प्रवासी वाहतूक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र यामध्ये फारसे यश नाही.
कोट- १
स्कूलबस चालक,
कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका सर्वच उद्योगधंद्यांना बसला आहे. अनलॉकच्या टप्प्यात बहुतांश उद्योग, धंदे पूर्ववत झाले; परंतु शाळा सुरू नसल्यामुळे स्कूल बस जागेवरच उभ्या आहेत. यामुळे वाहनचालकांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यायी रोजगारदेखील उपलब्ध नाही. स्कूलबस जागेवरच उभ्या असल्याने शासनाने वाहनाचा विविध प्रकारचा कर माफ करणे अपेक्षित आहे-
त्र्यंबक कोकणे, स्कूलबस चालक.
कोट- २
शाळा सुरू नसल्याने स्कूलबसही बंद आहे, वाहने उभी करून त्यांची देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि कर्जाचे हप्ते आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न स्कूलबसचालकांना पडला आहे. त्यामुळे शासकीय स्तरावर याविषयी सकारात्मक निर्णय घेऊन करात व कर्ज हप्त्यांना स्थगिती देण्याची आवश्यकता आहे.
-शांताराम बोराडे, स्कूलबस चालक
कोट -३
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून काही प्रमाणात का होईना शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन होणे आवश्यक आहे. मर्यादित विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू झाली तरी त्यातून स्कूलबस चालकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकेल. शाळा सुरू होणारच नसेल तर शासनाने करदात्या स्कूलबस चालकांसाठी विशेष अनुदानाचे पॅकेज देण्याची गरज निर्माण झाली आहे.
रामदास नवले, स्कूलबस चालक
कोट-४
विद्यार्थी वाहतूक बंद असल्याने स्कूलबस चालकांसमोर रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. काही स्कूलबस चालकांनी भाजीपाला, फळविक्रीसह छोटे-मोठे व्यावसाय सुरू केले आहे. तर अनेक चालकांवर कर्जाचे हप्ते वाढत असल्याने त्यांची वाहने विकण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत शासनाने स्कूल बसचालकांना दिलासा देण्यासाठी गांभीर्यपूर्वक विचार करून विशेष धोरण आखण्याची गरज आहे.
समाधान जाधव, स्कूलबस चालक
शहरातील स्कूल बसची संख्या -२,३५०