सिन्नर: सिन्नर-शिर्डी या महामार्गाचे पाणी वाहून जाण्यासाठी वावी ग्रामपंचायतीच्या हद्दीतून करण्यात येणाऱ्या गटारीचे पाइप जमिनीपासून उंच असल्याने त्यामुळे महामार्गाच्या कडेला असलेल्या दुकानदारांना व शेतकऱ्यांना ये-जाण्याच्या मार्ग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जमिनीवरुन जाणारे ड्रेनेजचे पाइप जमिनीत गाडून काम करण्यात यावे, अन्यथा महामार्गालगतच्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया वावी हद्दीतील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
सिन्नर-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या महामार्गाचे वावी गावात सुरू असलेले भरावयुक्त उड्डाणपुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. या उड्डाणपुलावरचे व सर्व्हिस रस्त्याचे पाणी वाहून जाण्यासाठी महामार्गालगत ड्रेनेजचे पाणी टाकण्याचे काम सुरू आहे. या अवाढव्य पाइपमुळे रस्त्याचे पलीकडचे दिसणे मुश्कील झाले आहे. जमिनीच्या सर्वसाधारण पातळीपासून हे पाइप अधिक उंचीवर टाकण्यात आले आहेत. या गटारीच्या पाइपमुळे लगतच्या रहिवाशांची बांधकामे सुमारे पाच फूट खाली जाणार असल्याची भीती आहे.
महामार्गालगतच्या व्यावसायिक व ग्रामस्थांनी या बांधकामाला विरोध दर्शवला असून ग्रामपंचायतीकडे याबाबत तक्रार केली आहे. मात्र या महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने स्थानिक ग्रामपंचायतीलाही विश्वासात घेतले नसल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे. वावी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोठे आणि किती खोदकाम केले जाते, किती खासगी व शासकीय जागांचे भूसंपादन केले जाणार आहे याची माहितीही ग्रामपंचायतीला दिली नसल्याची तक्रार सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच व सदस्य विजय काटे यांनी केली आहे.
उड्डाणपुलाचे काम करताना जमिनीच्या समपातळीत ते करावे, सांडपाणी वाहून येणाऱ्या पाइप गटारीचे काम भूमिगत करावे व सर्व्हिस रस्त्याची उंची वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
----------------
‘वावी गावातून महामार्ग कशा पद्धतीने जाणार आहे याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीला माहिती दिली जात नाही. घाईगडबडीत गावातील कामे उरकून घेतली जात आहे. रस्ता व गावातील गटारीचे नुकसान होत आहे. भरावाच्या उड्डाणपुलातून केवळ एक बोगदा आहे. त्यामुळे गावाचे दोन भागात विभाजन होणार आहे. किमान दोन बोगदे द्यावे व गावातून जाणाऱ्या महामार्गाची व ड्रेनेजबाबत माहिती न दिल्यास गावातील उड्डाणपुलाचे काम बंद करुन आंदोलन करण्यात येईल.
- विजय काटे, माजी सरपंच
----------------
वावी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कामाबाबत महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार माहिती देत नाही. ड्रेनेजची माहिती देत नाही. गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या कामाचा आराखडा द्यावा. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांना भेटून तक्रार केली आहे. ठेकेदार व अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
- कन्हैयालाल भुतडा, सरपंच,वावी
---------------
‘ड्रेनेजचे पाइप जमिनीखालून टाकावे, गटार भूमिगत करावी. आताच या कामामुळे ये-जा करण्यासाठी रस्ता राहिला नाही. व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केली आहे. गटारीचे काम भूमिगत न केल्यास व्यावसायिकांना आंदोलन करावे लागेल.
- जगदीश पटेल, व्यावसायिक, वावी
-----------------
वावी गावाजवळ सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामाचे ड्रेनेचे पाइप रस्त्यावरुन जात असल्याने व्यावसायिक व ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. (३१ सिन्नर ३)
===Photopath===
310321\31nsk_30_31032021_13.jpg
===Caption===
३१ सिन्नर ३