नाशिक : सिडको-अंबड परिसरातील गौतमनगर झोपडपट्टीत सार्वजनिक शौचालयाच्या उभारणीबाबत वारंवार निवेदने देऊनही दखल न घेणाऱ्या प्रशासनाविरोधी रहिवाशांनी महापालिकेवर टमरेल मोर्चा काढला.महापालिकेच्या प्रवेशद्वारावर टमरेल बजाव आंदोलन करत रहिवाशांनी आयुक्तांविरोधी जोरदार घोषणाबाजी केली शिवाय जोपर्यंत आयुक्त स्वत: येऊन दखल घेत नाही तोपर्यंत न हटण्याचाही निर्धार आंदोलकांनी केल्याने तणाव वाढला होता. अखेर अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले.गौतमनगर झोपडपट्टी परिसरात सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नसल्याने महिलांना उघड्यावर नैसर्गिक विधी उरकावे लागतात. अस्वच्छतेमुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. शौचालयाच्या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याने अखेर रहिवाशांनी हाती टमरेल घेऊन महापालिका मुख्यालय गाठले आणि पालिकेच्या द्वारातच विधी उरकण्याचा इशारा दिला. बहुजन समाज पार्टी आणि मार्शल गु्रपच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रहिवाशांनी महापालिकेविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत आयुक्त स्वत: येऊन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचाही निर्धार केला. दरम्यान, आयुक्तांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले परंतु आयुक्तांनीच प्रवेशद्वारावर यावे, असा आग्रह आंदोलकांनी धरला. त्यामुळे तणाव वाढत गेला. परिस्थितीचा अंदाज घेत पोलिसांची जादा कुमक वाहनासह मागविण्यात आली. सुमारे तीन तासांच्या आंदोलनानंतर आंदोलकांनी अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांची भेट घेतली. चव्हाण यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत सध्या एक मोबाइल टॉयलेट उपलब्ध करून देण्याचे आणि काही दिवसांनी आणखी अतिरिक्त चार टॉयलेट उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी टमरेल वाजवून आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी)
शौचालय मागणीसाठी टमरेल मोर्चा
By admin | Published: November 27, 2015 11:33 PM