लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर राहावे, त्याचबरोबर नियमित कर्तव्यावर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या संकल्पनेतून ‘टाइमस्टॅम्प’ नावाचे सॉफ्टवेअर तयार केले असून, सकाळ-सायंकाळी आरोग्य केंद्रातील हजर अधिकारी, कर्मचा-यांची या सॉफ्टवेअरमध्ये नोंद घेतली जात आहे. त्यामुळे शिस्त लागण्याबरोबरच आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हजर नसल्याच्या तक्रारीही बंद झाल्या आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे कार्यान्वित करण्यात आले असून, याठिकाणी चोवीस तास वैद्यकीय सुविधा देण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. तथापि, ब-याच वेळा दुर्गम व ग्रामीण भागात सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जातात. त्यात ब-या प्रमाणात तथ्यही असल्याचे आढळून आले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक जनतेला आरोग्य सुविधा मिळावी व नियुक्त अधिकारी, कर्मचा-यांनी नियमित आरोग्य केंद्रात हजेरी लावावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी काही दिवसांपूर्वीच ‘टाइमस्टॅम्प’ नावाची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावरील नियुक्तअधिकारी व कर्मचा-यांनी त्यांच्या कर्तव्यावरील ठराविक वेळेत आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर उभे राहून त्याचे छायाचित्र ‘टाइमस्टॅम्प’ सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्याठिकाणी इंटरनेटची रेंज नसेल अशा ठिकाणावरील अधिकारी, कर्मचा-यांनी सेल्फी काढून आरोग्य विभागाच्या अधिका-यांना पाठविण्याची सोयदेखील करण्यात आली आहे. ‘टाइमस्टॅम्प’मुळे अधिकारी व कर्मचा-यांना वेळेत कर्तव्यावर हजर होणे बंधनकारक झाल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकटीकरणास मोठा हातभार लागला आहे. जिल्हा आरोग्य अधिका-यांकडे यापूर्वी वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांच्या आरोग्य केंद्रातील गैरहजेरीबाबत केल्या जाणा-या तक्रारी त्यामुळे बंद झाल्या असून, याशिवाय ‘टाइमस्टॅम्प’ सॉफ्टवेअरमध्ये फोटो अपलोड केल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचारी गायब होऊ नये यासाठी जिल्हा पातळीवरील अधिकारी, गट विकास अधिकाºयांना अचानक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना भेटी देण्याचे आदेश लिना बनसोड यांनी दिले आहेत.