सिडको : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सिडकोमधील ‘टिप्पर टोळी’च्या चौघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यास अंबड पोलीस यशस्वी ठरले आहेत. शनिवारी (दि.२६) मध्यरात्री गुन्हे शोधपथकाने चौघा संशयितांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्यासोबत असलेल्या दोघा संशयित फरार झाले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रात्री अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शोध पथकाककडून गस्त घातली जात होती. यावेळी पोलिसांना काही संशयित केवल पार्क परिसरातील खान बंगल्याच्या बाजूला संशयास्पद हालचाली करताना आढळले. पोलिसांनी तातडीने त्यांच्या दिशेने वाहन दामटविले असता चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र ते यशस्वी झाले नाही. पोलिसांनी मोठ्या शिताफीने चौघा दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दरोड्याचे साहित्य त्यांच्याकडे आढळून आले. पोलिसांनी ‘टिप्पर’चे चौघे संशयित मोबीन तनवीर कादरी (२१), गौरव उमेश पाटील (१९, दोघे रा. उपेंद्रनगर), चेतन भागचंद बाफना (२६,रा. पवननगर), आकाश गणेश कुमावत (२१, दत्त चौक) या चौघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक म्हात्रे करीत आहेत.या संशयित टोळीची झडती घेतली असता त्यांच्याकडून तलवार, गावठी कट्टा, दोरी, मिरचीची पूड, दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरण्यात येणारी दुचाकीवर कोणाचा संशय येऊ नये किंवा पोलिसांकडून तपास लावला जाऊ नये, यासाठी संशयितांनी दुचाकीवरील क्रमांक काढून टाकल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘टिप्पर’ संशयितांच्या पुन्हा आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:51 AM