नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून गुन्हेगारी टोळ्या चालविणाऱ्या म्होरक्यांना चाप बसावा यासाठी त्यांची राज्यातील विविध कारागृहांत रवानगी करण्याचा पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी दिलेल्या प्रस्तावास गृह विभागाने मान्यता दिली असून, त्यानुसार सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगचा म्होरक्या समीर नासीर पठाण याची पुणे येथील येरवडा कारागृहात, तर त्याच्या तिघा साथीदारांची विविध जिल्ह्यांतील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे़ या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी काहीअंशी कमी होण्यास मदत होणार आहे़ शहरातील विविध गुन्हेगारी टोळक्यांचे म्होरके गुन्हेगारी कारवायांमुळे मध्यवर्ती कारागृहात आहेत़ मात्र तरीही शहरात गोळीबार तसेच खुनाच्या घटना घडत असल्याने पोलीस यंत्रणा हतबल झाली होती़ या म्होरक्यांकडून मध्यवर्ती कारागृहातून शहरातील गुन्हेगारीची सूत्रे हलविली जात होती़ त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या म्होरक्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांना राज्यातील विविध कारागृहांमध्ये ठेवण्याबाबत गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता़ तसेच यावर उपाय म्हणून पठाणला तीन दिवसांपूर्वीच अंडासेलमध्येही ठेवण्यात आले होते़ पोलीस आयुक्तांच्या प्रस्तावास शासनाच्या गृह विभागाने मान्यता दिली असून, त्यानुसार टिप्परच्या गँगचा प्रमुख समीर पठाण याची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे़ तसेच टिप्पर गँगमधील नितीन काळे यास मुंबईतील तळोजा, नागेश सोनवणे यास धुळ्याच्या तर सुनील अनार्थे याची औरंगाबादच्या कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे़ पठाण याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी लूट, पोलीस अधिकाऱ्यास मारहाण केल्याचे गुन्हे दाखल आहेत़ (प्रतिनिधी)
टिप्पर गॅँगचा म्होरका येरवडा कारागृहात
By admin | Published: June 28, 2016 12:20 AM