सरदवाडी : सिन्नर बाह्यवळण रस्त्यासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने तो उलटल्याची घटना सरदवाडी येथे घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रस्त्यालगतच्या एका घराचे नुकसान झाले आहे. नाशिक - पुणे महामार्गाच्या सिन्नर बाह्यवळण रस्त्याचे काम सरदवाडी गावालगत सुरू आहे. या कामासाठी जामगाव शिवारातून आणण्यात येणाऱ्या मुरुमाची वाहतूक महिनाभरापासून सरदवाडी रस्त्याने करण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मुरुम घेऊन येणाऱ्या डंपरचा (क्र. जीजे १०, टीटी ८९५४) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारासमोर टायर फुटला. यामुळे वेगात असलेला डंपर रस्त्यालगतच्या झाडांवर आदळून एका घराजवळ उलटला. त्यामुळे घराचे नुकसान झाले. आडव्या पडलेल्या डंपरमध्ये अडकलेल्या चालकाला काचा फोडून तरुणांनी सुखरूप बाहेर काढले. टायर फुटण्यासह डंपर उलटल्याने प्रचंड आवाज होऊन धुळीचे लोट दिसू लागल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिसरातील नागरिकांची नेहमीची बसण्याची जागा, शेजारीच दुकान, प्राथमिक शाळेचे प्रवेशद्वार अशा ठिकाणीच घडलेल्या या अपघातामुळे सर्वांच्याच काळजात धस्स् झाले. डंपर सरळ करेपर्यंत खाली कोणी दाबले तर गेले नाही ना या धास्तीने सुमारे तासभर उपस्थितांचा जीव टांगणीला लागला होता. जेसीबी आणि क्रेन मशीनच्या मदतीने डंपर सरळ केल्यानंतर कोणतीही जीवितहानी न झाल्याच्या खात्रीनंतर सर्वांना हायसे वाटले. (वार्ताहर)
टायर फुटल्याने डंपर उलटला
By admin | Published: January 14, 2016 10:49 PM