नाशिक - आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामध्ये भाजप आघाडीवर असून, केंद्रीय मंत्र्यांसह पक्षातील पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेतेही विविध ठिकाणचे दौरे करत आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर जहरी टीका केली. तसेच, एकेरी उल्लेख करत २०२४ च्या निवडणुकीत आपटून टाकू, या शब्दांत निशाणा साधला होता. आता, आमदार राणेंच्या या टिकेला खासदार कोल्हेंनीही जशास तसे प्रत्त्युत्तर दिले आहे.
४०० किलो मीटर दूरवरुन येणाऱ्या आमदार महोदयांनी माझ्या मतदारसंघातील नागरिकांना गृहीत धरू नये. कोण निवडून येणार हे माझ्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि सर्व मतदाराजा ठरवतील, तो त्यांचा अधिकार आहे, अशा शब्दात आमदार नितेश राणेंना फटकारले. तसेच, हे आमदार महोदय हे त्यांच्या वडिलांच्या कर्तृत्वाच्या जीवावर ओळखले जातात. त्यांचं स्वत:चं कार्यकर्तृत्व काय, असा सवालही त्यांनी राणेंना केला. तर, छत्रपती संभाजी राजेंचं कार्य घरघरात पोहोचवण्यासाठी या महाशयांनी काय केलंय का, त्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का. जर नसेल तर क्रियेवीन वाचाळता व्यर्थ, असे म्हणत कोल्हेंनी राणेंना टोला लगावला. तर, ज्यांची वैचारीक उंची नाही, त्यांनी बोलू नये असेही कोल्हे यांनी म्हटलं.
तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय?
कला हे माझ्या उदरनिर्वाहाचं साधन आहे, माझ्या उत्पन्नाचा सोर्सच कला आहे. मी माझ्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोत जाहीरपणे सांगू शकतो. आमदार राणे हे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत उजळमाथ्याने समाजासमोर मांडू शकतात का, सांगू शकतात का? तरच त्यावर बोलू असे म्हणत नितेश राणेंच्या टिकेवर प्रत्युत्तर दिलं. तसेच, राणेंना एकप्रकारे उत्पन्नाचे स्त्रोत सांगावे, असे आव्हानही अमोल कोल्हे यांनी दिले आहे.