सिटू भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. कराड यांनी सांगितले की मोदी सरकारच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला दि.२६ मे रोजी सहा महिने पूर्ण होत असल्याने देशातील कामगार संघटनांच्या वतीने बुधवारी काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. काळ्या फिती लावून, काळे झेंडे दाखवून, मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे, तर याच दिवसापासून मोदी सरकारच्या विरोधात देशव्यापी जनआंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने देशातील प्रत्येक नागरिकास मोफत कोरोना लस द्यावी, सर्व बेरोजगारांना मोफत धान्य आणि दरमहा ७५०० रुपये अर्थसाहाय्य मिळावे, तीन शेतकी कायदे, वीज दुरुस्ती विधेयक (२०२०) मागे घेण्यात यावे, हमीभाव कायदा करण्यात यावा, चारही श्रमसंहिता मागे घेऊन भारतीय श्रम परिषद आयोजित करा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सीताराम ठोंबरे, कल्पना शिंदे, तुकाराम सोनजे, संतोष काकडे, मोहन जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान, सरकारच्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी डाव्या आघाडीने २४ ते ३० मे दरम्यान सरकार विरोधी सप्ताह पाळण्याचे आवाहन केले असून, बुधवार (दि.२६) रोजी शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, युवक संघटना आपल्या घरावर काळे झेंडे लावतील, असे आवाहन किसान सभेने केले आहे, तर मोदी सरकारच्या विरोधातील या आंदोलनाला काँग्रेसप्रणित इंटकने पाठिंबा दिल्याची माहिती इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली आहे.