नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीसाठी प्रशासकीय व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून, बुधवारी दुपारी या मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होऊन दोन तासांत निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील ६४४ मतदारांनी शंभर टक्के आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्र्यालयातील स्ट्रॉँग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने झालेली राजकीय चुरस पाहता निवडणूक निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घटना घडल्याने मतदारांचा कौल नेमका कोणाला मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे व राष्टÑवादीचे शिवाजी सहाणे या दोघांमध्येच खरी लढत असल्यामुळे प्रशासनाच्या मते दोन तासांतच मतमोजणी होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत भवन येथे या निवडणुकीची मतमोजणी केली जाणार असून, प्रत्यक्ष ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असली तरी, मतमोजणी अधिकारी व कर्मचाºयांना सकाळी ६ वाजताच उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मतमोजणीसाठी दोन टेबल लावण्यात येणार आहे. पसंती क्रमाने उमेदवार निवडून द्यायचा असल्यामुळे प्रारंभी सर्व मतपेट्या मतमोजणीस्थळी आणून त्या त्या मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या व प्रत्यक्ष मतपेटीतील मतांची संख्या मोजून पाहिली जाणार आहे.सर्व मतपत्रिका एका हौदात टाकून त्या सरमिसळ केल्या जातील व प्रत्येकी २५ मतपत्रिकेचे गठ्ठे केले जाणार आहेत. दोन मतमोजणी टेबलवर त्यांचे समान वाटप केल्यानंतर अगोदर वैध, अवैध व संशयित मतपत्रिकांचे विलगीकरण केले जाईल. निवडणूक अधिकारी अंतिम निर्णय घेतील.त्यानंतरच खºया अर्थाने वैध मतांच्या तुलनेने उमेदवाराला निवडून येण्यासाठी कोटा निश्चित करून प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार आहे. या सर्व पद्धतीचा सराव करण्यासाठी बुधवारी दुपारी ३ वाजता सर्व मतमोजणी अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण व रंगीत तालीम करून घेण्यात येणार आहे.
विधान परिषद मतमोजणीची आज रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:29 AM