नाशिक : सुरुवातीचे तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आनंदावर विरजण पडलेल्या दांडियाप्रेमींना रविवार व सोमवार असे दोन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत गरबा खेळण्याची मुभा शासनाने दिली असून, वाद्य वाजविण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंतची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे सलग तीन दिवस दांडियाप्रेमींचा हिरमोड झाला. विशेष करून तरुण-तरुणींच्या उत्साहावर विरजण पडले. त्यानंतर पावसाने उघडीप दिलेली असली तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री दहा वाजेपर्यंतच वाद्य वाजविण्यास अनुमती असल्याने व दांडियासाठी रात्री नऊ ते दहा वाजेनंतरच तरुण-तरुणी बाहेर पडत असल्याने त्यांना पुरेसा वेळ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वयेच मिळालेल्या सवलतीचा विचार करून राज्य सरकारने ज्या काही दिवसांसाठी रात्री दहा वाजेची अट शिथिल केली त्यात नवरात्रोत्सवात अष्टमी व नवमी या दोन दिवसांचा समावेश आहे. रविवारी अष्टमी व सोमवारी नवमी असून, या दोन्ही दिवशी दांडिया व गरबाप्रेमींना रात्री बारा वाजेपर्यंत आनंद लुटता येणार आहे. (प्रतिनिधी)
आजपासून रंगणार बारापर्यंत दांडिया
By admin | Published: October 09, 2016 1:14 AM