नाशिक : जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढल्यानंतर आता एक हजार ३८४ ग्रामपंचायतींमधील प्रवर्गनिहाय महिला आरक्षण शुक्रवारी (दि.५) निश्चित केले जाणार आहे. यामध्ये ५० टक्के महिलांचे आरक्षण काढण्यात येणार असल्याने कोणाचे नशीब उजळणार याकडे लक्ष लागून आहे. महिला आरक्षण सोडतीनंतर त्या त्या ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाचा फैसला होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनुसूचित क्षेत्रासाठीच्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ११ तालुक्यांतील ८१० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी दि. २८ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर महिलांसाठी आरक्षण सोडत अगोदर दि. ३ फेब्रुवारी रोजी काढण्याचे निश्चित करण्यात होते. परंतु, ३ फेब्रुवारीला राज्यपाल जिल्हा दौऱ्यावर असल्याने ही सोडत ५ फेब्रुवारी रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, शुक्रवारी महिला आरक्षण सोडत निघणार आहे. यावेळी ५० टक्के महिलांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० या काळात मुदत संपलेल्या ६२१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला होता. त्यात ५५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ५६५ ग्रामपंचायतींसाठी गेल्या १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार ३८४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण जाहीर केले जाणार होते. मात्र पेठ, सुरगाणा, कळवण आणि त्र्यंबकेश्वर या पूर्णत: अनुसूचित क्षेत्रासाठीच्या तालुक्यातील ५७५ ग्रामपंचायतींचे आरक्षण वगळून उर्वरित ८१० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण काढण्यात आले. आता पेठ, सुरगाणा, कळवण व त्र्यंबकेश्वर तालुक्यासह उर्वरित सर्व तालुक्यांतील ग्रामपंचायतींमधील महिला सरपंचपदासाठी आरक्षण काढले जाणार आहे. सरपंचपद व सदस्यपदाच्या लिलावामुळे निवडणूक आयोगाने यापूर्वीच उमराणे, ता. देवळा व कातरणे, ता. येवला या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक रद्दबातल ठरविली आहे.कुठे येणार महिलाराज?जिल्ह्यातील ८१० पैकी ४२९ ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाले असून, ३८१ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर झाले असले तरी त्यातील ५० टक्के सरपंचपद हे महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गातील महिलांसाठी प्रांत स्तरावर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी महिलाराज येते, याचा फैसला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गावस्तरावर राजकीय हालचालींना वेग आला आहे.असा आहे सोडतीचा कार्यक्रमशुक्रवारी (दि. ५) सकाळी १० वाजता नाशिक, मालेगाव, बागलाण, चांदवड, कळवण, निफाड, इगतपुरी, येवला व दिंडोरी या तालुक्यातील सरपंचपदासाठी महिला आरक्षण काढण्यात येईल, तर दुपारी ३ वाजता देवळा, सुरगाणा, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, नांदगाव व पेठ या तालुक्यातील आरक्षण निश्चित केले जाणार आहे. प्रांतस्तरावर हे आरक्षण निश्चित केले जाणार असल्याने प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे.सदस्य अज्ञातस्थळी रवानायंदा ग्रामपंचायत निवडणुकीत अटीतटीच्या लढती बघायला मिळाल्या. तरुण वर्ग या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उतरल्याने चुरशीच्या लढती झाल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के बसत सत्तांतरे झाली. काही ठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली आहे तर काही ठिकाणी उन्नीस-बीस अशी अवस्था आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या असून, दगाफटका होऊ नये म्हणून आरक्षण निश्चितीपूर्वीच अनेक ठिकाणी सदस्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे.
सरपंचपदासाठी आज नशिबाचा कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 4:40 PM
नाशिक : जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढल्यानंतर आता एक हजार ३८४ ग्रामपंचायतींमधील प्रवर्गनिहाय महिला आरक्षण शुक्रवारी (दि.५) निश्चित केले जाणार आहे. यामध्ये ५० टक्के महिलांचे आरक्षण काढण्यात येणार असल्याने कोणाचे नशीब उजळणार याकडे लक्ष लागून आहे. महिला आरक्षण सोडतीनंतर त्या त्या ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाचा फैसला होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
ठळक मुद्देगावस्तरावर राजकीय हालचालींना वेग