नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या पुरेशा प्रमाणात अपलोड न झाल्याने वाद सुरू आहे. याप्रकरणी दडवादडवी नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी शासकीय यंत्रणांनी प्रत्येकावर साथ प्रतिबंधक कायद्यांतर्गत काही ना काही जबाबदारी दिली होती. त्यानंतरदेखील हा घोळ उपस्थित झाल्याने आता ब्लेम गेम सुरू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांना नोटीस बाजवली, तर त्यांनी नाशिक शहरातील कोरोनाबळींची वेळेत माहिती अपलोड केली नाही म्हणून कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांना नोटीस बजावली आहे, तर त्यांनी महापालिकेने यापूर्वीच सर्व रुग्णालयांना नोटिसा बजावूनही माहिती अपलोड झाली नसल्याचे स्पष्टीकरण देत शहरातील १८८ रुग्णालयांना नोटिसा धाडल्या आहेत. त्यात महापालिकेच्या बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचाही समावेश आहे. या सर्व रुग्णालयांना माहिती अपलोड करण्यासाठी शनिवार (दि. १९) ही अखेरची मुदत देण्यात आली असून, तशी माहिती डॉ. पलोड यांनी अनंत पवार यांना कळविली आहे.
इन्फो...
आता खासगी लॅबही रडारवर
कोरोनाबळींबाबत महापालिकेला दोन मोठ्या अडचणी आहेत. अनेक खासगी लॅबने आरटीपीसीआर चाचण्या केल्या. परंतु, त्याच्या नोंदीच पोर्टलवर अपलोड केल्या नाहीत. अशा लॅबमधून मोबाइलवर पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट घेऊन अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांचे मृत्यू झाले; परंतु त्याची माहिती अपलोड करण्यासाठी गेल्यावर पॉझिटिव्ह असल्याचे नावच कोविड पोर्टलवर नसल्याने अडचण झाली आहे. अनेकांची नावेही सदोष असल्याने त्यांची नावे दाखल करण्यात अडचण झाली आहे. त्यामुळे आता अशा लॅबचालकांनादेखील नोटिसा बजावण्यात येणार आहेत. याशिवाय जिल्हाबाह्य रुग्णांचीदेखील अडचण झाली आहे. धुळे, जळगाव येथून संदर्भित झालेल्या रुग्णांची पुरेशी माहिती न मिळाल्याने खासगी रुग्णालयांनादेखील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती अपलोड करणे अडचणीचे ठरले आहे.
इन्फाे...
महापालिकेने आपल्याच रुग्णालयांना नेाटिसा बजावण्याचा अजब प्रकार प्रथमच घडला आहे. बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयांमध्ये यंदा कोराेनाकाळात अत्यंत प्रभावी उपचार झाले असले तरी याच रुग्णालयातील अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्याने तेथील नोंदीही रखडल्या आहेत.