नाशिक : विमा कंपन्यांकडून करण्यात आलेली थर्डपार्टी इन्शुरन्समधील ४० टक्के दरवाढ मागे घ्यावी, पथकर नाके हटवावे यांसह विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनने शनिवारी (दि. ८) मध्यरात्री १२ वाजेपासून पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनही सहभागी होणार असून, जिल्हाभरातून १५ हजारांहून अधिक वाहने रस्त्यावर धावणार नसल्याची माहिती नाशिक जिल्हा मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष अंजू सिंघल यांनी दिली. आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या निर्देशानुसार नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने मालवाहतूकदारांच्या मागण्यांसाठी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, या संपात जिल्हाभरातील सुमारे १५ हजारांहून अधिक मालवाहतूक करणारी वाहने कोणत्याही प्रकारची वाहतूक करणार नाही. हैदराबाद येथे ३ एप्रिलला आयआरडीएसोबत झालेल्या बैठकीत इन्शुरन्सची वाढलेली रक्कम कमी करण्यासंबंधी कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने शनिवारी मध्यरात्रीपासून देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील सुमारे ६० लाखांहून अधिक मालवाहतूक करणारी वाहने आज मध्यरात्रीपासून रस्त्यावर येणार नसल्याचे सिंघल यांनी सांगितले. या संपात जिल्हाभरातील सुमारे सातशेहून अधिक मालवाहतूकदार सहभागी होणार असून, यात शहरातील पाचशे मालवाहतूकदारांचा समावेश आहे. या संपादरम्यान जिल्हाभरातील १५ हजारांहून अधिक वाहने मालवाहतूक करणार नसल्याने संपाबाबत वेळीच योग्य तोडगा निघाला नाही, तर नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात मालवाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
आज मध्यरात्रीपासून चक्का जाम
By admin | Published: April 08, 2017 1:18 AM