नाशिक : आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत लॉटरीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बुधवारी (दि. २०) अंतिम मुदत असून, मुदत संपल्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर मुदतवाढ न देता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देऊन त्यानंतर तत्काळ प्रवेशाची संधी न मिळालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना संधी देण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ४२२ शाळांमधील ४९२७ जागांसाठी ४ एप्रिल रोजी लॉटरी काढण्यात आली. त्यात निवड झालेल्या ४ हजार ६१३ विद्यार्थ्यांचे शाळास्तरावर प्रवेश निश्चित करण्याची डेडलाइन २० एप्रिल आहे; परंतु मंगळवारपर्यंत (दि. १९) केवळ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. त्यामुळे उपलब्ध जागांपैकी हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रिक्त जागांवर तत्काळ प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवून उर्वरित विद्यार्थ्यांना आरटीई प्रक्रियेंतर्गत रिक्त जागांवर प्रवेशाची संधी देण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
आरटीई प्रवेशाची स्थिती
आरटीईअंतर्गत एकूण शाळा - ४२२
एकूण प्रवेश - ४९२७
आलेले अर्ज -१६५६७
निश्चित प्रवेश - १२००