नाशिक : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशाचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले असून, सोमवार (दि.३) पासून आयटीआय प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. यावर्षीही आयटीआयची प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने होणार असून, विद्यार्थ्यांना ३ ते ३० जून या कालावधीत आॅनलाइन अर्ज दाखल करावे लागणार आहेत.आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सोमवारी सकाळी ११ वाजेपासून सकाळी संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व आयटीआय संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असणार असल्याने याठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहितीपुस्तिका उपलब्ध होणार आहे. आॅनलाइन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते, त्याचा नोंदणी क्रमांक हाच युजर आयडी म्हणून तयार होईल. अर्ज भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत घ्यावी व प्रवेश अर्ज निश्चित करावा. प्रवेश अर्ज व प्रवेश निश्चितीसाठी प्रमाणपत्रे संबंधित आयटीआय संस्थेत सादर करावीत. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर अर्ज निश्चितीकरण पावती व निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाची प्रत संस्थेमार्फत देण्यात येईल. त्यानंतरच अर्जाचा गुणवत्ता फेऱ्यांसाठी विचार करण्यात येणार आहे.नाशिकमध्ये आयटीआयच्या २६ हजार ९०० जागानाशिकमध्ये सरकारी आयटीआयच्या १४ हजार ३६ जागा आहेत, तर खासगी आयटीईच्या १२ हजार ८६४ अशा एकूण २६ हजार ९०० जागा आहेत. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी आयटीआयमधील जागांमध्ये कपात करण्यात आली आहे. मागीलवर्षी २०१८ मध्ये शासकीय आयटीआयमध्ये १४ हजार ४१७ जागा होत्या. त्या तुलनेत यावर्षी ३८१ जागा कमी झाल्या आहेत. तर खासगी आयटीआयमधील १३ हजार २८९ जागांमध्ये २१५ जागांची घट झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी एकूण ११०६ जागांची कपात झाली आहे.
आजपासून आयटीआयची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:17 AM