नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा दरवर्षी जुलै व ऑगस्टमध्ये घेतली जाते. कोरोनामुळे यंदा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अद्याप परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले नसले तरी शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले असून, बुधवारी (दि.१८) अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान अर्ज करावे लागणार आहेत.
दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व निवडक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने आवेदपत्रे भरावे लागेल. तर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे २३ व २४ ऑगस्टदरम्यान शुल्क भरावे लागेल. श्रेणीसुधार अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना २८ मे व २ जुलैच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार परीक्षेची एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी परीक्षा शुल्क भरलेले असेल तर त्यांनी यावेळी शुल्क भरण्याची गरज नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे; मात्र सर्व विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.