नाशिक : बारावीनंतर औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी जागा वाटप झाल्यानंतर पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना बुधवारी शेवटची संधी आहे. त्यानंतर गुरुवारी (दि.२४) दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचलनालयाने दिली आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळालेल्या जागेची स्वीकृतीसाठी मंगळवार (दि. २२) तर स्वीकृत केलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करण्यासाठी बुधवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी वाटप करण्यात आलेल्या जागा स्वीकृत केल्या आहेत; परंतु प्रवेश निश्चित केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना बुधवारी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. औषध निर्माणशास्त्र पदवी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी करण्यात आलेल्या जागा वाटपाबाबत विद्यार्थ्यांनी स्वत: पडताळणी केली असून, यात विद्यार्थ्यांना स्वत:चे पात्रता गुण, प्रवर्ग, लिंग, आरक्षण आदी विषयांसंबंधी केलेले दावे बरोबर असल्याची खात्री करून घेण्याची संधी मिळाली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहितीची पडताळणी करून यासंदर्भातील कागदपत्रांविषयीही खात्री करून घेत बुधवारपर्यंत जागा वाटप झालेल्या संस्थेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्र व प्रवेश शुल्काची पूर्तता करून प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने केल्या आहेत.