नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांच्या आरक्षणांची सोडत शुक्रवारी (दि.७) सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात काढण्यात येणार आहे. १२२ सदस्यसंख्या आणि ३१ प्रभाग निश्चित असल्याने कोणत्या प्रभागात आरक्षण पडते तसेच कोण फायदा-तोट्यात राहील, याचा फैसला होणार आहे. नशिबाची परीक्षा पाहणाऱ्या या सोडतीबाबत इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आरक्षण निश्चित झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. दरम्यान, प्रशासनाकडून सोडतीसंदर्भात तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना घोषित होण्यापूर्वीच शुक्रवारी प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्गासह महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागांची सोडत काढली जाणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात काढण्यात येणाऱ्या या सोडतीची तयारी पूर्ण झाली आहे. कालिदासमध्ये व्यासपीठासह तीन स्क्रीनची तर बाहेर दोन स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार असून, वैद्यकीय पथकही तैनात ठेवण्यात येणार आहे. कालिदासच्या बाहेरील आवारात हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय आवारातच दोन ठिकाणी प्रभागांचे नकाशे प्रसिद्ध केले जाणार आहेत. प्रशासनाने सोडतीसंबंधी बुधवारीच रंगीत तालीम घेतली होती. सोडतीप्रसंगी प्रारंभी अनुसूचित जातीसाठी १८ जागांकरिता, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित नऊ जागांकरिता सोडत काढली जाणार आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता २७ टक्के आरक्षणानुसार ३३ जागा येत असल्याने प्रत्येक प्रभागात एक यानुसार ३१ जागा निश्चित करण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक प्रवर्गातील महिलांसाठीच्या जागा आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी नऊ जागा, तर अनुसूचित जमाती महिलांकरिता पाच जागा सोडतीद्वारे निश्चित केल्या जातील. सरतेशेवटी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या शिल्लक दोन जागांमध्ये एक महिलासाठी आरक्षित करण्यात येणार आहे. या सर्व सोडतीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असून, पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
आज नशिबाचा फैसला !
By admin | Published: October 07, 2016 1:25 AM