लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संपूर्ण जगभरात सध्या कोरोनाशी लढाई सुरू असताना रविवारी (दि.२१) कंकणाकृती सूर्यग्रहण होत असल्याने समाजातील काही घटकांकडून सूर्यग्रहणाचा कोरोनाशी संबंध जोडून या सूर्यग्रहणाकडे वेगवेगळ््या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. सूर्यग्रहणामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होऊ शकतो किंवा नाही याविषयी सोशल मीडियावर चर्चा झडत असताना अंतराळ ज्योतिष शास्त्राज्ञांसह खगोल अभ्यासकांसह, वैद्यकीय तज्ज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी अशाप्रकारे सूर्यग्रहणाचा कोरोनावर परिणाम होण्याची सूतराम शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे.यापूर्वी २६ डिसेंबर, २०१९ रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातून दिसली होती. त्यावेळी उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते.त्यानंतर २०२९ मध्ये पुन्हा १२ जून, २६ जून व ११ जुलै अशी लागोपाठ तीन ग्रहण होणार आहेत. अशी लागोपाठ तीन ग्रहणे अनेकवेळा आलेली असून, यावेळी कोरोना आणि सूर्यग्रहण यांचाही संबंध सांगितला जातो. त्यात काहीही तथ्य नाही. कोरोना येणार असल्याचे भाकीत कोणीही केले नव्हते. तसेच सूर्यग्रहणामुळे जर कोरोना जाणार असता, तर २६ डिसेंबरच्या सूर्यग्रहणातच तो नष्ट झाला असता. त्यामुळे या सूर्यग्रहणामुळे कोरोना नष्ट होईल, या गोष्टीत काहीही तथ्य नसल्याचेही वैज्ञानिकांकडून सांगण्यात येत असले तरी ज्योतिष अभ्यासकांनी मात्र या गोष्टीत निश्चितच तथ्य असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
सूर्यग्रहण आणि कोरोनाचा जोडला जाणारा संबंध तथ्यहीन आहे. कोरोनावर सुरक्षिततेची नियम पाळूनच जाणार आहे. ग्रहण म्हणजे पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका रेषेत आल्याने होणारी एक खगोलीय घटना आहे. त्यामुळे हे ग्रहण पाहताना प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून व ग्रहण चष्मे वापरूच सूर्यग्रहण पाहावे.- सुजाता बाबर, खगोलशास्त्र अभ्यासक.
सूर्यग्रहणामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होण्याचा अथवा विषाणू नष्ट होण्याचा दावा फोल आणि तथ्यहीन असून ही एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे, असे म्हणावे लागेल. अशाप्रकारे दावा करणारे विविध संदर्भ देत असले तरी त्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येत आहे.- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
भारतातील बहुतांश भागात दिसणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होणार असल्याच्या गोष्टीत निश्चितच तथ्य आहे. गेल्यावेळी डिसेंबरमध्ये झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य ग्रहमालेतील प्लुटो या ग्रहाच्या प्रभावामुळे कोरोनासारख्या महाभयंकर आजाराची सुरुवात झाली होती. परंतु आता प्लुटो त्याची जागा बदलणार असल्याने कोरोनाचा प्रभाव कमी होणार आहे. परंतु, जानेवारी २०२१ नंतर या आजाराचा प्रभाव पुन्हा वाढणार असून, एप्रिल २०२१नंतर कोरोनाचा प्रभाव जगभरातून नष्ट होऊ शकतो.- नरेंद्र धारणे, ज्योतिष अभ्यासक, नाशिक.