नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या (दि.१९) मतदान होत असून, अकरा संचालकांच्या पदासाठी ४१ उमेदवार रिंगणात असून, कोकाटे पिंगळे गटाचे शेतकरी विकास पॅनल, कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल व स्व. सहकारमहर्षी उत्तमराव ढिकले पॅनलमध्ये तिरंगी लढत होत आहे. २१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. २९ वरून २१ वर आलेल्या संचालक मंडळाच्या जागांपैकी दहा जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, राखीव सहा जागांसह तालुका प्रतिनिधींच्या पाच जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. रविवारी शहरातच काही लॉन्सवर सभासद मतदारांचा मेळावा घेऊन डिनर डिप्लोमसीची खेळी काही पॅनलकडून करण्यात आली. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सायंकाळनंतर छुप्या प्रचाराला वेग आल्याचे चित्र होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. भ्रष्टाचाराच्या आरोपापासून पारदर्शक कारभारापर्यंतचे वचननामे व जाहीरनामे तिन्ही पॅनलच्या नेत्यांनी मतदार सभासदांना मेळाव्यातून दिल्याचे चित्र होते. नांदगाव, नाशिक, निफाड, सिन्नर व कळवण या पाच तालुका प्रतिनिधी संचालक पदासाठी तिन्ही पॅनलमधील अठरा उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत असून, त्यात आजी-माजी आमदारांसह विद्यमान खासदारांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा बॅँकेसाठी आज मतदान तयारी पूर्ण, २१ मे ला ११ संचालकांचा फैसला
By admin | Published: May 19, 2015 1:21 AM