रामनवमी निमित्त बुधवारी (दि. २१) काळाराम मंदिरात पहाटे साडेपाच वाजता धनंजय पुजारी यांच्या हस्ते काकड आरती करण्यात येईल. त्यानंतर साडेसात वाजता काळाराम मंदिर वंशपरंपरागत पूजेचे मानकरी विलासबुवा पुजारी यांच्या प्रमुख हस्ते महापूजन केले जाईल तर दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता देवाला अन्नकोट आणि आरती कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजेला नरेशबुवा पुजारी यांच्या हस्ते रामाची शेजारती होईल.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार मंदिर
भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे तर शुक्रवारी कामदा एकादशीला रामरथ उत्सव असल्याने यावर्षी रथयात्रा रद्द करण्यात आली आहे त्यामुळे राममंदिराच्या आवारात उत्सव मूर्ती पूजन पुजारी आणि विश्वस्तांच्या उपस्थित केले जाणार आहे.
कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढल्याने सार्वजनिक उत्सव होणार नाही तसेच दुपारी मंदिरात प्रभू रामचंद्र यांची प्रतिमा फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेऊन मंदिरात असलेले पारंपरिक वाद्य वाजवून रामजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.