दरवर्षी मुस्लिम बांधव रमजान पर्वाचा २६ वा उपवास सोडल्यानंतर शब ए कद्र साजरी करतात. या रात्रीच्या औचित्यावर मशिदींमधून विविध धार्मिक कार्यक्रम होतात. समाजबांधव एकत्रितपणे कुराणपठण करतात आणि अल्लाहच्या दरबारी दुवा मागतात. या रात्रीत धर्मग्रंथ कुराण पृथ्वीतलावर अवतरीत करण्यात आल्याचे धर्मगुरूंकडून सांगितले जाते. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या रात्रीवर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या साथीमुळे शासनाच्या वतीने धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कडक निर्बंधांमुळे या विशेष रात्रीलाही मशिदींमध्ये नमाजपठण होणार नसल्याचे शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी सांगितले.
समाजबांधवांनी कोरोनाच्या निवारणासाठी या पवित्र रात्री अधिकाधिक दुवा करावी. आपापल्या घरात राहून पारंपरिक पद्धतीने रात्र अल्लाहच्या उपासनेत (इबादत) व्यतीत करण्याचे आवाहन खतीब यांच्यासह विविध धर्मगुरूंनी केले आहे.