पंचवटी : श्रीरामनवमीनंतर पाच दिवसांनी येणाऱ्या कामदा एकादशीला शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने श्रीराम व गरूडाची रथयात्रा काढण्यात येणार असून, या रथोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता यंदाच्या उत्सवाचे मानकरी चंदनबुवा पुजाधिकारी यांच्या हस्ते दोन्ही रथांचे पूजन करण्यात येऊन बुवांनी रथ ओढण्याचे आदेश दिल्यानंतर रथोत्सव यात्रेला प्रारंभ करण्यात येईल. सायंकाळी श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून रथयात्रेला सुरुवात करण्यात येईल. रामरथात भोगमूर्ती तर गरूडाच्या रथात रामाच्या पादुका ठेवल्या जातील. सायंकाळी श्री काळाराम मंदिरातून रामाच्या पादुका तसेच भोगमूर्तींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आल्यानंतर मूर्तींचे पूजन व आरती केली जाईल. रामरथ ओढण्याची जबाबदारी सरदार रास्ते आखाडा तालीम संघ व समस्त पाथरवट समाजाकडे तर गरुड रथाचे मानकरी अहल्याराम व्यायामशाळा असल्याने दोन्ही रथाच्या मानकऱ्यांना मानाचा गंध लावून त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला जाईल.
आज श्रीराम, गरुड रथोत्सव सोहळा
By admin | Published: April 07, 2017 2:22 AM