नाशिक : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेला आज (दि. ६) पासून परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरुवात होणार आहे. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता या नाट्ययज्ञाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.नाशिक विभागातून या स्पर्धेसाठी २१ नाट्यप्रयोग सादर होणार असून, सगळ्यांच नाट्यकर्मींसाठी पर्वणी असलेल्या या स्पर्धेतून अनेक चुरशीचे प्रयोग बघायला मिळणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी विजय नाट्य मंडळाच्या ‘हे रंग जीवनाचे’ या लेखक दिग्दर्शक नेताजी भोईर यांच्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. या स्पर्धेअंतर्गत मंगळवारी (दि. ७) विच्छा माझी पुरी करा, बुधवारी (दि. ८) रक्तबीज, गुरुवारी (दि. ९) ‘सतम तारा’, शुक्रवारी (दि. १०) श्यामची आई, शनिवारी (दि. ११) आणि धम्म..., रविवारी (दि. १२) सती न गेलेली महासती, सोमवारी (दि. १३) पोशा, मंगळवारी (दि. १४) प्रयास, बुधवारी (दि. १५) एडिपस रेक्स, गुरुवारी (दि. १६) वंशभेद, शुक्रवारी (दि. १७) तितिक्षा, शनिवारी (दि. १८) ये मामला गडबड हंै, सोमवारी (दि. २०) ती रात्र, मंगळवारी (दि. २१) अॅनिमल प्लानेट, बुधवारी (दि. २२) नाव झालं पाहिजे, गुरुवारी (दि. २३) छक्के पंजे, शुक्रवारी (दि. २४) सकाळच्या सत्रात एक्झिट, तर संध्याकाळच्या सत्रात मून विदाउट स्काय, शनिवारी (दि. २५) सकाळच्या सत्रात उत्तरदायित्व आणि संध्याकाळच्या सत्रात चाहूल हे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.सकाळच्या सत्रातील नाट्यप्रयोग सकाळी ११.३० वाजता तर संध्याकाळच्या सत्रातील नाट्यप्रयोग संध्याकाळी सात वाजता सादर होणार असून, या स्पर्धेसाठी नाट्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आजपासून राज्य नाट्य स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 12:14 AM