नाशिक : तीळगूळ घ्या, गोड गोड बोला, अशा एकमेकांना शुभेच्छा देत रविवार (दि. १४) रोजी मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा होणार असून, यानिमित्त बाजारपेठेत तीळगूळ, तिळाचे लाडू, वड्या तसेच काटेरी हलवा खरेदीसाठी गर्दी दिसत होती. तसेच महिलांचा वाण लुटण्यासाठी लागणारे गाजरे, ओंब्या, ऊस आणि प्लॅस्टिकचे वाण सामान घेण्यासाठी लगबग दिसत होती. भारतीय संस्कृती मकर संक्रांतीच्या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश असून, सूर्याचे उत्तरायण सुरू होत आहे. त्यामुळे थंडी कमी होऊन उन्हाची तीव्र वाढत जाईल. मकर संक्रांतीला महिला सूर्य देवतेचे पूजन, सुगड पूजन, सुवासिनींना वाण देणे असे विधी करतात. तसेच स्वयंपाकात खिचडी, भाजी-भाकरी, गुळपोळी असा बेत करून सायंकाळी घरोघरी जाऊन तीळगूळ देण्याची प्रथा आहे.
सूर्याचा मकर राशीत प्रवेश
रविवार (दि. १४) रोजी दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाल दुपारी १ वाजून ४६ मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे.