नाशिक: जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानुसार शुक्रवारपासून सरपंचपद निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. दि. १२ आणि १५ अशा दोन टप्प्यात जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींना गावचा प्रथम नागरिक लाभणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे दीडशे ग्रामपंचायतींची निवडणूक होण्याची शक्यता आहे. निफाड, सिन्नर, चांदवड व नांदगाव हे चार तालुकेवगळता उर्वरित ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार पार पडणार आहे.
गेल्या महिन्यात जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता या ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या १२ आणि १५ तारखेला सरपंचपदाची निवडणूक घेतली जाणार असून, याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी काढले आहेत. यंदा सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने आरक्षणापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे, तर काही ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट असल्याने केवळ औपचारिकता राहिली आहे.
सरपंचपदाच्या बोलीप्रकरणी निवडणूक आयोगाने यापूर्वीच देवळा तालुक्यातील उमराणे व येवला तालुक्यातील कातरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया रद्द ठरविली. आता निफाड, सिन्नर, चांदवड व नांदगाव या चार तालुक्यांमधील सरपंचपदाच्या निवडीला न्यायालयाने स्थगिती दिल्याने २७७ ग्रामपंचायतींवगळून उर्वरित ३४२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. नाशिक, त्र्यंबक, दिंडोरी, इगतपुरी, येवला, मालेगाव, कळवण, बागलाण व देवळा या तालुक्यांमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ज्या तालुक्यांमध्ये १२ तारखेला निवडणूक होणार आहे. तेथील संपूर्ण तयारी झाली असून, त्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आली आहे.
स्थगिती देण्यात आलेल्या चारही तालुक्यांमधील ग्रामपंचायतींची सरपंचपदाची निवडणूक ही १६ तारखेनंतर केव्हाही घेतली जाण्याची शक्यता आहे. तोवर संबंधित तहसीलदारांना आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.
--इन्फो--
सुरक्षिततेचे नियम पाळावे लागणार
सरपंच निवडणूक ग्रामपंचायत सदस्यांमध्ये होणार असली तरी सुरक्षितता नियमांचे पालन करूनच प्रक्रिया राबविली जाणार आहे. याबाबतची काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदारांनी केलेले आहे. काही ठिकाणी सकाळी १०, तर काही ग्रामपंचायतींमध्ये दुपारी ३ या वेळेत सरपंच निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
--इन्फो--
निफाड, सिन्नर, चांदवड व नांदगाव स्थगित
सरपंचपदाचे आरक्षण काढताना तहसीलदारांकडून नियम आणि निकषांचा भंग करण्यात आल्याचा आक्षेप घेत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली. संवर्गनिहाय आरक्षण आणि लोकसंख्येच्या तुलनेतील तफावत व त्यानुसार प्रवर्गामध्ये तफावत असल्याची पुरावे न्यायालयात सादर केल्याने न्यायालयाने निफाड, सिन्नर, चांदवड या तीन तालुक्यांतील २१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडीला स्थगिती देण्यात आलेली आहे. आता याच कारणास्तव नांदगाव तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींनादेखील स्थगिती मिळालेली आहे. निफाड तालुक्यातील ६५, सिन्नर तालुक्यातील १०० तर चांदवड तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींना आता स्थगिती मिळाली आहे.