राज्य परिवहन महामंडळाने अंग काढून घेतल्यानंतर राज्य शासनाने महापालिकेच्या गळ्यात ही सेवा टाकली. मात्र, त्यानंतर वाढत्या शहराची गरज म्हणून आणि वेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारे ही सेवा व्यवहार्य करण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने ही जबाबदारी घेण्यात आली. २०१८ मध्ये यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतरही बसचे कंत्राट देण्यासह आगार तयार करणे, पिकअप शेड बीओटीवर तयार करणे, वाहक पुरविण्यासाठी एजन्सी नेमणे यासह वेगवेगळ्या कामांमुळे ही सेवा सुरू करण्यासाठी वेळ गेला. त्यानंतर बससेवेसाठी आवश्यक असलेला परवाना राज्य शासनाकडून वेळेत मिळाला नाही. परवान्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली तर कोराेनामुळे बस भाड्याचे दर मंजूर होण्यासाठी अडचणी उद्भवल्या अशा स्थितीत आता महापालिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ही सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून ओझरजवळील जागेत वापराविनाच उभ्या असलेल्या बसेसची चाचणी मंगळवारी (दि. २२) घेण्यात आली. त्यानंतर आता ही सेवा सुरू करण्यासाठी संचालक मंडळाची अंतिम बैठक गुरुवारी (दि. २४) होणार आहे. या बैठकीत बससेवा जुलै महिन्याच्या कोणत्या तारखेला सुरू करायची यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
इन्फो..
पन्नास बस धावणार
महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात केवळ ५० बस रस्त्यावर आणण्यात येणार आहेत. एकूण नऊ मार्गांवर ही बससेवा सुरू होणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणि प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन वेगवेगळ्या मार्गांवर बस वाढविण्यात येणार आहे.
इन्फो..
बससेवेला मुहूर्त लागताना अनेक संचालक मात्र बदलून गेले आहेत. महापालिकेचे पदाधिकारी बदलल्याने संचालक मंडळातदेखील मान्यता देण्याचा प्रस्ताव गुरुवारी (दि.२४) होणाऱ्या बैठकीत सादर केला जाणार आहे.