नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना या निवडणुकीत काँग्रेस व राष्टवादीच्या आघाडीबाबत मंगळवारी मुंबईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होत असून, या बैठकीत आघाडी करण्यावर एकमत झाल्यानंतरच उमेदवार निश्चितीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. दरम्यान, राष्टवादीकडून इच्छुक असलेले अशोक सावंत व शिवाजी सहाणे यांनी पुण्यात राष्टÑवादीच्या नेत्यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे होता, परंतु यंदाच्या निवडणुकीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीबरोबरच लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम घोषित झाला आहे, या पोटनिवडणुकीचे जागा वाटपावरून दोन्ही कॉँग्रेसमध्ये बेबनाव निर्माण झाला असून, त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या राष्टÑवादीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली होती ते पाहता आगामी निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष लागून असून, या संदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक बोलविण्यात आली आहे. त्यानंतर नाशिकच्या जागेचा निर्णय होणार आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून अशोक सावंत यांनी रविवारी पक्षाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, गजानन शेलार, नाना महाले यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची भेट घेतली, तर शिवाजी सहाणे यांनी सोमवारी भेट घेऊन उमेदवारीसाठी इच्छा प्रदर्शित केली. दोन्ही इच्छुकांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर अजित पवार यांनी त्यांना निवडणुकीत विजयी होण्याचे गणित मांडले. राष्टÑवादीकडे फक्त १०० मते असून, उर्वरित मतांची जुळवाजुळवी कशी होईल, अशी विचारणा केली. सर्वांत खर्चिक ही निवडणूक असल्यामुळे त्यांनी इच्छुकांना सबुरीचा सल्ला दिला व कॉँग्रेसबरोबर आघाडीची बैठक झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल व उमेदवार जाहीर करण्यात येईल, असे त्यांना सांगितले.
कॉँग्रेस आघाडीची भूमिका आज ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 1:50 AM