नाशिक : सर्वत्र दिवाळीच्या सणाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून, शुक्रवारी (दि. २८) आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे. धनत्रयोदशीचे पारंपरिक पूजन करण्याबरोबरच आयुर्वेदाचा प्रवर्तक असलेल्या धन्वंतरी देवतेचेदेखील पूजन करण्यात येणार आहे.धनत्रयोदशीला तिन्ही सांजेनंतर धने, गूळ, साळीच्या लाह्यासह अलंकाराची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात येणार आहे. यावर्षी धनत्रयोदशीला प्रदोष असल्याने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंतीदेखील मोठ्या प्रमाणात साजरी केली जात असल्याने शहरातील विविध रुग्णालये तसेच खासगी दवाखान्यांमध्ये धन्वंतरीच्या मूर्तीचे उत्साहात पूजन केले जाणार आहे. शासनाने धनत्रयोदशी हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून घोषित केला असल्याने यानिमित्ताने आयुर्वेदिक दवाखाने तसेच संस्थांमध्ये आयुर्वेदिक जनजागृती शिबिरे, उपक्रम यांची रेलचेल बघायला मिळणार आहे.व्यापारी वर्गामध्येदेखील धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर विशेष लगबग दिसून येत असून, जमा-खर्चाच्या वह्या, चोपड्या, रोजमेळ, खतावण्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)
आज धनत्रयोदशीनिमित्त पूजन
By admin | Published: October 28, 2016 12:31 AM