नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. ६) सकाळी ८ वाजेपासून अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाउस येथे करण्यात येणार असून, मतमोजणीची पद्धती पाहता, दुपारनंतर प्रत्यक्ष मोजणी सुरू झाल्यावरच मतदारांचा कल लक्षात येणार आहे. शुक्रवारी या निवडणुकीसाठी नाशिक विभागातील ३५३ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. ५४.३८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी कॉँग्रेस आघाडीचे डॉ. सुधीर तांबे, भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील, तिसऱ्या आघाडीचे कॉ. प्रकाश देसले यांच्यासह सतरा उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येकानेच आपल्या विजयाचा दावा केला असला तरी, सोमवारी मतमोजणीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणीसाठी ३० टेबल लावण्यात येणार असून, प्रत्येक टेबलावर चार कर्मचारी असणार आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रारंभी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी होईल. त्यानंतर प्रत्येक टेबलावर एकेक मतपेटी देऊन त्यातील केंद्रनिहाय मतपत्रिकांची मोजणी करून खात्री करण्यात येईल व प्रत्येकी पन्नास मतपत्रिकांचा एक गठ्ठा करून टेबलनिहाय एक हजार मतपत्रिकांची मोजणी सुरू केली जाईल. ही सारी प्रक्रिया चार ते पाच तास चालणार असून, प्रत्यक्ष उमेदवारनिहाय त्यांना मिळालेल्या पसंतीक्रम मतदानाची मोजणी होईल. साधारणत: चार वाजेनंतरच मतदारांचा कल लक्षात येणार आहे. या मतमोजणीत अगोदर उमेदवाराला निवडून येण्यासाठी मतांचा कोटा निश्चित केला जाईल. एकूण झालेले मतदान व त्याला दोनने भागाकार करून अधिकचे एक मतदान अशा पद्धतीने हा कोटा काढला जाणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर रविवारी विभागीय आयुक्त डॉ. एकनाथ डवले, जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी तयारीचा आढावा घेतला.
‘पदवीधर’ची आज मतमोजणी
By admin | Published: February 06, 2017 12:43 AM