लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानानंतर शुक्रवारी मतमोजणी होणार असून, कोण विजयी होतो आणि कोणत्या पक्षाला बहुमत मिळते याबाबत शहरवासीयांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. कॅम्परोडच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नवीन इमारतीत १, २, ८, ९, १०, ११ या प्रभागांची मतमोजणी होणार असून, शिवाजी जिमखान्यात १२, १५, १७, १८, २० व २१ या प्रभागांची तर तालुका क्रीडा संकुलात ५, ६, ७, जाखोट्या भवनात १४, १६, १९ तर श्रीकृष्ण लॉन्समध्ये ३, ४, १३ या प्रभागांची मतमोजणी होणार आहे. बुधवारी किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. कालपासून सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आकडेमोड करण्यात व्यस्त झाले असून, उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. कोण निवडून येईल याविषयी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून, मतदारांनी मात्र पैजा लावल्या आहेत. मतदानाची टक्केवारी, बहुरंगी लढती, राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोणत्या परिसरात कोणाला जास्त प्रतिसाद मिळाला, कोण कोणावर नाराज होते, कोणी कोणासाठी काम केले याबाबत उघडपणे मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे. शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर सत्ता स्थापनेबाबत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, बसपासारख्या पक्षांच्या प्रमुखांमध्ये आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता असून, विद्यमान नगरसेवक सुनील गायकवाड, संजय दुसाने, मदन गायकवाड, विजया काळे यांसह महापौरपदाचे दावेदार माजी आमदार शेख रशीद, माजी महापौर अब्दुल मलीक शेख, विद्यमान उपमहापौर युनुस इसा, माजी उपमहापौर ज्योती भोसले आदींच्या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
मालेगाव महापालिकेची आज मतमोजणी
By admin | Published: May 26, 2017 12:46 AM