नाशिक : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक मर्चंट बँकेची मतमोजणी बुधवारी (दि.२६) सिडकोतील संभाजी इनडोअर स्टेडिअम येथे करण्यात येणार असून, मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. सायंकाळपर्यंत या निवडणुकीचा कल येण्याचा अंदाज आहे.गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात गाजत असलेल्या व दहा वर्षांनंतर संचालक मंडळाची निवडणूक होत असलेल्या मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांची धावपळ उडाली होती. पॅनल निर्मितीच्या हालचाली व त्यात समावेश होण्यासाठी केली जाणारी लॉबिंग, प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल व त्यानंतर माघारीसाठी करण्यात आलेली मनधरणी पाहता, खऱ्या अर्थाने निवडणूक गाजली होती. पावणे दोन लाख मतदार व ८२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. त्यासाठी रविवारी जिल्ह्णात मतदान झाले असता, बॅँकेच्या एकूण १ लाख ७६ हजार २६२ मतदारांपैकी ६३ हजार ८३९ मतदारांनी म्हणजे सुमारे ३६ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी सिडकोतील संभाजी इनडोअर स्टेडिअम येथे बुधवारी सकाळी आठ वाजेपासून करण्यात येणार असून, मतमोजणीसाठी १०४ टेबलवर ५०० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. सर्वप्रथम प्रत्येक मतपेटीतील मतांची खात्री करण्यात येणार असून, नंतर सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे तयार केले जातील. त्याचवेळी वैध-अवैध मतांची विभागणी केली जाईल. अगोदर सर्वसाधारण गटातील उमेदवारांची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. या गटात तीन फेºया होणार आहेत. दुसºया फेरीनंतर मतदारांचा कल लक्षात येईल, असा अंदाज आहे. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री आठ वाजता थांबविण्यात येईल. उर्वरित मोजणी दुसºया दिवशी म्हणजेच गुरुवारी दि.२७ डिसेंबर रोजी पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर महिला व मागासवर्गीय उमेदवारांची मतमोजणी करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसरे यांनी दिली. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी संभाजी स्टेडिअमला पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मर्चंट बॅँकेची आज मतमोजणी ; तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:58 AM