नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या नवनिर्वाचित संचालकांची सभा उद्या (दि. ३) जून रोजी सकाळी ११ वाजता होत असून, या सभेतच जिल्हा बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. २७ मे रोेजीच या विशेष बैठकीची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपसहनिबंधक सतीश खरे यांनी काढली होती. त्यानुसार ही सभा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या नवीन इमारतीतील सभागृहात सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. याच सभेत जिल्हा बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड येत्या पाच वर्षांसाठी होणार आहे. मात्र, संचालकांच्या अंतर्गत सोयीनुसार अध्यक्ष व उपाध्यक्ष पद हे प्रत्येकी एक वर्षाचे असणार असल्याचे समजते. निवडणूक निर्णय अधिकारी सतीश खरे यांनी या सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सकाळी ११ ते ११.१५ वाजता सभेच्या इतिवृत्तावर स्वाक्षरी करणे, ११.१६ ते ११:३० अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याची वेळ, ११:३१ ते ११:४५ नामनिर्देशन पत्र छाननी व निर्णय, ११:४६ ते १२:०० नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची वेळ, १२:०१ ते १२: १५ आवश्यकता भासल्यास मतदानाची पूर्व तयारी, १२:१६ ते १२:३० मतदानाची वेळ, त्यानंतर लगेचच मतमोजणी व नंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर हिरे गट व कोकाटे-भोसले गटाने दावा केला असून, निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
अध्यक्षपदासाठी आज निवडणूक
By admin | Published: June 03, 2015 12:10 AM