नाशिक : महापालिकेची मासिक महासभा बुधवारी (दि.२०) सकाळी ११.३० वाजता होणार असून, यावेळी वादग्रस्त एलईडीच्या ठेक्याविषयी निवृत्त उपअभियंत्याच्या विभागीय चौकशीच्या प्रस्तावाच्या निमित्ताने वादळी चर्चा झडण्याची शक्यता आहे. शहरातील अस्तित्वात असलेले पथदीप काढून बीओटी तत्त्वावर एलईडी फिटिंग बसविण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेबद्दल ठपका ठेवत महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी विद्युत विभागातील तत्कालीन उपअभियंता (सध्या निवृत्त) नारायण गोपाळराव आगरकर यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. तब्बल चार वर्षांनंतर आयुक्तांनी सदर प्रकरण बाहेर काढत महापालिकेच्या फसवणुकीबद्दल उपअभियंत्यावर दोषारोप ठेवले आहेत. सुमारे २०२ कोटी रुपयांच्या एलईडी फिटिंगच्या कामात महापालिकेची फसवणूक झाल्याचा आरोप वारंवार महासभांमधून सदस्य करत आलेले आहेत. याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आता उपअभियंत्याच्या चौकशीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या वादग्रस्त विषयावर महासभेत वादळी चर्चा झडण्याची शक्यता असून, प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांवरूनही सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
मनपाची आज महासभा,
By admin | Published: July 20, 2016 12:20 AM