नाशिक : देशात जातीयवाद, धर्मवादाचा विषारी विचार आता संस्थात्मक पातळीवरही भिनवला जात आहे. भविष्यात हा विचार वाढत गेला तर देशाची वेगाने दुर्दशा होईल. गेल्या ७० वर्षांत या देशात काहीच झाले नाही, असा प्रचारही चुकीचा आहे. गांधी-नेहरुंच्या जिवावर आजचा भारत उभा आहे अन्यथा या देशाचे कधीच विघटन झाले असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित प्रकट मुलाखतीत बोलताना मांडले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त लोकेश शेवडे यांनी कुमार केतकर यांची मुलाखत घेतली. यावेळी, पत्रकारितेपासून ते राजकारणापर्यंतच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना केतकर यांनी सांगितले, माझ्याबद्दल अनेक आक्षेप चर्चिले जातात. मी सोनिया-राहुल गांधींचा भाट असल्याचे म्हटले जाते. मी कॉँग्रेसचीच भूमिका मांडतो. सोईनुसार भूमिका बदलतो, अशीही टीका केली जाते. परंतु, मी १८८५ पासून कॉँग्रेसची बाजू घेतो आहे. ज्यावेळी माझा जन्मही झालेला नव्हता. कॉँग्रेसने ज्या पद्धतीने परिस्थितीचा सामना करत देशाची बांधणी केली, त्याचा विचार मी करत गेलो. गांधी-नेहरू या दोनच नेत्यांचा विचार जगात प्रभावशाली आहे. रशियात गोर्बाचेव्ह यांनी लो कशाही पुनर्रचना हा शब्द मांडला. मिश्र अर्थव्यवस्था म्हणून त्याची मांडणी नेहरुंनी आधीच केलेली होती. कॉँग्रेस हा बहुमताचा पक्ष कधीच नव्हता, परंतु तो बहुसंख्यांकांना मान्य होता. ‘मेक इन इंडिया’ची सुरुवात मनमोहन सिंगांपासूनच झाली होती. आधी ‘मेड इन इंडिया’ची दखल घ्या, मग गेल्या ७० वर्षांत काहीच झाले नाही, हे सांगा असा टोलाही केतकर यांनी मोदी सरकारचे नाव न घेता मारला. सोशल मीडियावर सुरू असलेल्या धिंगाण्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. परंतु, आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने विचार करू शकतो, हाच एकमेव उपाय असल्याचेही केतकर यांनी सांगितले. सोवियत युनियनच्या पाडावानंतर जग अधिक असुरक्षित बनल्याचे सांगत भारताला आता विश्वासार्ह मित्रच राहिला नसल्याचे केतकर यांनी स्पष्ट केले. पत्रकाराला राजकीय भूमिका असावी, पण ती लवचिक असावी. काही चुकीचे वाटत असल्यास त्यात बदल करण्याची मानसिकताही असली पाहिजे. मी कडक कम्युनिष्ट होतो. परंतु, वाचन-अनुभवातून माझ्या विचारसरणीत बदल होत गेला, असेही केतकर यांनी सांगितले. प्रारंभी कुसुमाग्रज स्मारकाचे अध्यक्ष व आमदार हेमंत टकले यांच्या हस्ते केतकर यांचा सत्कार करण्यात आला.राजकारण्यांनी पत्रकारितेत यावे काय?शेवडे यांनी पत्रकारांनी राजकारणात यावे काय, असा प्रश्न केतकर यांना विचारला. त्यावर उत्तर देताना केतकर म्हणाले, पत्रकार हे राजकारणीच असतात. चर्चिल हा वार्ताहर होता. नेहरू हे तर ‘नॅशनल हेराल्ड’चे संस्थापक होते. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, टिळक हे पत्रकारच होते. पत्रकार हे राजकारणातच असतात, परंतु काही पत्रकार तसे दाखवत नाहीत, असे सांगत केतकर यांनी ‘राजकारण्यांनी पत्रकारितेत यावे काय’ असा उलटा सवाल शेवडे यांना विचारला. आज सनदी अधिकारी माधव गोडबोले भूमिका मांडत असतात. चिदंबरम, एम. जे. अकबर हे सातत्याने लेखन करत असतात. घटना ही नि:पक्षपाती असते. त्यावर पत्रकार जेव्हा भाष्य करतो तेव्हा त्याला भूमिका मांडावी लागते, असेही केतकर यांनी सांगितले.
गांधी-नेहरूंच्या जिवावर आजचा भारत उभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 1:17 AM