लासलगाव : गेल्या वर्षी कांद्याचा वांदा झाल्याचे चित्र पाहायला मिळाल, यावर्षी कुठेतरी थोडाफार भाव कांद्याला मिळत असताना लगेच निर्यातीवरील अनुदान घटवून कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न सरकारने केला. सरकारने जाहीर केलेले कांदा अनुदान अजूनही मिळू शकलेले नाही. यासाठी लवकरच मोठे जनआंदोलन केले जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी लासलगाव येथे बोलताना सांगितले.राजू शेट्टी गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या दौ-यावर असून विविध शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. शेट्टी यांनी शुक्र वारी (दि.१४) दुपारी लासलगाव बाजार समितीत शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कांदा लिलावाची पाहणी करून प्रत्यक्षात कांदा भावाबाबत माहितीही करून घेतली. निवडणुकीच्या तोंडावर दोनशे रु पये अनुदानाचे गाजर दाखवून शेतक-यांची बोळवण केली गेली ते अनुदान अजूनही शेतक-यांना मिळालेले नाही. आता जे मंत्री जिल्ह्यात येतील तेव्हा त्यांच्यावर कांदे मारून फेका म्हणजे तुमचे कष्टाचे अनुदान तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही असा सल्ला शेट्टी यांनी दिला. सरकार दुष्काळाच्या योग्य त्या उपाययोजना करीत नसल्याचा आरोप करून एकीकडे गोवंश रक्षा कायदा केला जातो तर दुसरीकडे महाराष्ट्रात ५३ जनावरे चारा छावणी सुरु केली नाही म्हणून मृत्यू होतात. यात गोमातेचे प्रमाण अधिक असल्याचेही ते म्हणाले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी भाजपा सरकारने सोशल मीडियावर भावनांचा खोटा खेळ खेळून सत्तेचा डाव साधला असल्याचे सांगून सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला. यावेळी प्रांतिक सदस्य दीपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, सुधाकर मोगल, सोमनाथ बोराडे ,संदीप जगताप, रतन मटाले ,नाना बच्छाव , संजय गारे , लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कांदाप्रश्नी लवकरच जनआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 5:29 PM
राजू शेट्टी : लासलगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद
ठळक मुद्देआता जे मंत्री जिल्ह्यात येतील तेव्हा त्यांच्यावर कांदे मारून फेका म्हणजे तुमचे कष्टाचे अनुदान तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही असा सल्ला शेट्टी यांनी दिला.