नाशिक : पदवीधर मतदारसंघासाठी उद्या (दि. ३) शुक्रवारी मतदान होत असून, नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत ३५३ मतदान केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. येत्या ६ फेब्रुवारी रोजी अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये मतमोजणी होईल.भाजपाच्या वतीने डॉ. प्रशांत पाटील, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने कॉँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे, माकपच्या वतीने राजू देसले यांच्यासह १७ उमेदवारांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार असले तरी खरी लढत डॉ. प्रशांत पाटील व डॉ. सुधीर तांबे यांच्यात होईल. माकपचे राजू देसलेही चांगली लढत देऊ शकतात. पदवीधरसाठी १७ सेंटीमीटर लांब व ५ सेंटीमीटर रुंद मतपत्रिका तयार करण्यात आली आहे. त्यावर सतराही उमेदवारांचे नावे छायाचित्रांसोबत देण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी ८०५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी (दि.३०) प्रशिक्षण देण्यात आले आहे. दरम्यान पाचही जिल्ह्णांचे मिळून ३० टेबल मतमोजणीसाठी राहणार असून, प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी-अधिकारी राहणार आहेत. मतदानासाठी येतांना ओळखीचा पुरावा म्हणून मतदाराला सोबत ओळखपत्र आणावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे. मतदान ओळखपत्राबरोबरच पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, छायाचित्र असलेले पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, केंद्र सरकार,राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम किंवा उद्योग संस्थेचे दिलेले छायाचित्र ओळखपत्र, बॅँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक (खाते ३१ डिसेंबर २०१६ पूर्वीचे किंवा तत्पूर्वी उघडलेले असावे.) पट्टे किंवा प्रॉपर्टी नोदणी छायाचित्र असलेले कागदपत्र, ३१ डिसेंबरपूर्वी देण्यात आलेली छायाचित्र असलेली शिधापत्रिका, सक्षम अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्गा छायाचित्र असलेले प्रमाणपत्र, ३१ डिसेंबरपूर्वी देण्यात आलेला छायाचित्र असलेला शस्त्र परवाना यासह अन्य १३ कागदपत्रांपैकी ओळखपत्रासाठी कोणताही एक पुरावा सोबत असणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
पदवीधरसाठी आज मतदान
By admin | Published: February 03, 2017 1:42 AM