उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. २१) मतदान होत आहे. मतदानासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सुरक्षेच्या दृष्टीने मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. १८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी येथील प्राथमिक शाळेत मतदानाची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. स्वतंत्र बाजार समितीच्या स्थापनेनंतरची पहिलीच निवडणूक होत असल्याने निवडणूक कशी पार पडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. त्या आधारावर निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी, माथाडी या चार गटांसाठी स्वतंत्र चार मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एकूण ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.मतदान प्रक्रिया सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान होणार आहे. चारही गटात एकूण ५६७ मतदार असून, ते मतदानाचा हक्क बजावतील. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उभय दोन्ही पॅनलच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी केले आहे. बंदोबस्त चाचपणी करण्यासाठी देवळ्याचे पोलीस निरीक्षक टोणवे यांनी मतदान केंद्राला भेट दिली. (वार्ताहर)
उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान
By admin | Published: February 20, 2016 10:19 PM