नाशिक : जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३३६, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १०१० उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात २६५३ मतदान केंद्र असून, त्यातील २५३ सवंदेनशील आहेत. एकूण २४ लाख मतदार या निवडणूक मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर साहित्य रवाना करण्यात आले असून, चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी मंगळवारी मतदान होत असून, मतदान कर्मचारी मतदान साहित्य घेऊन केंद्रांकडे रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळपासून येथील छत्रपती शिवाजीमहाराज जिमखान्याच्या आवारात मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.मंगळवारी होत असलेल्या मतदानप्रक्रियेसाठी एक हजार ५९४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान कर्मचारी, एक शिपाई, तर चौदाशे मतदारसंख्या असलेल्या केंद्रांवर चार मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुरेश कोळी, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनी मतदान कर्मचाऱ्यांना मतदानप्रक्रियेविषयी माहिती दिली. यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील विविध गावांमधील मतदान केंद्रांवर साहित्य व कर्मचारी पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ४० बसेस, तर खासगी ४० वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूकप्रक्रियेसाठी १४ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाच्या मतपत्रिका असलेल्या मतदानयंत्रावर जिल्हा परिषदेसाठी, तर गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवर पंचायत समितीसाठी मतदान घेतले जाणार आहे. ५५४ मतदानयंत्रांमध्ये तालुक्यातील उमेदवारांचे भवितव्य बंद होणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या सात जागांसाठी ३१ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ६३ उमेदवार असे एकूण ९४ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ९४ मतदान केंद्र संवेदनशील, तर निमगाव येथील ५ केंद्र अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
आज मतदारराजाचा दिवस
By admin | Published: February 20, 2017 11:09 PM