नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेमार्फत शौचालय उभारणीचे कामकाज संथगतीने सुरू असल्याबद्दल राज्याच्या मुख्य सचिवांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी उर्वरित ३७७४ शौचालय उभारणीचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा अल्टिमेटम आरोग्य विभागाला दिला आहे. महापालिकेने उघड्यावर नैसर्गिक विधी करणाऱ्या कुटुंबांचा सर्व्हे केल्यानंतर केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीसाठी ७२६४ लाभार्थी निश्चित केले होते. शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने २ आॅक्टोबर २०१६ पर्यंत शौचालय उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार, महापालिकेने सुरुवातीला कामकाजास गती दिली. वैयक्तिक शौचालयांच्या उभारणीला सुरुवात झाली. सहा हजार रुपयांचा पहिला हप्ता सर्व लाभार्थींना वितरित करण्यात आला. तत्कालीन आयुक्त गेडाम यांनी तर आॅगस्ट २०१६ अखेरच शहर हगणदारीमुक्त करण्याचा निर्धार केला होता. परंतु, आॅगस्ट उलटला तरी अद्याप संपूर्ण शौचालय उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. गेल्या बुधवारी मुंबईत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे बैठक झाली असता त्यावेळी शौचालय उभारणीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. परंतु, महापालिकेने अद्यापही ३७७४ शौचालयांचे काम पूर्ण झाले नसल्याची माहिती दिल्यानंतर मुख्य सचिवांनी नाराजी दर्शवित लवकरात लवकर उद्दिष्टपूर्तीचे आदेश दिले. त्यानुसार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक, अभियंते यांची बैठक घेऊन डिसेंबर २०१६ अखेर उर्वरित शौचालय उभारणीचे काम पूर्ण करण्याचे आदेशित केले. (प्रतिनिधी)
शौचालय उभारणीचे काम संथगतीने
By admin | Published: September 02, 2016 11:12 PM