चांदवड - वेळ सकाळी साडेनऊ-दहा वाजेची... पावसाची दडी त्यात भाद्रपदचे चटके देणारं ऊन.. अशात अंगावर एकही कपडा नसलेला वृद्ध रस्त्याच्या कडेला पडलेला... रस्ता कसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३. चांदवड तालुक्यातील वडाळीभोई गावाजवळचा परिसर. कदाचित पोटात काही नसल्याने गतप्राण झाल्यागत रस्त्याच्या कडेला पडलेल्या या वृद्धाकडे ये-जा करणारे अनेकजण पाहून मनोरुग्ण म्हणून दुर्लक्ष करत होते.. पण कायमच अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारे सोमा टोलचे गस्ती पथक इथे आले अन् वृद्धाजवळ जात त्याची सुश्रुषा केली. ओळख पटल्यानंतर या वृद्धास नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.खरं तर रस्त्यालगत असे अनेक मनोरु ग्ण आढळतात. बऱ्याचदा परराज्यातून आणून त्यांना महामार्गावर सोडले जाते. ऊन, वारा पावसाचा सामना करत हे रुग्ण कसेतरी जीवन जगतात. आणि एखाद्या दिवशी अदृश्य होतात. अदृश्य या अर्थाने एकतर त्यांना दुसरीकडे कुणी घेऊन जातो नाहीतर त्यांचा मृत्यू तरी होतो.अशा या दुर्लक्षित घटकाकडे सोमा टोलच्या गस्ती पथकाने धाव घेत ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ या न्यायाने त्यांनी प्रथमत: त्याची पोटाची खळगी भरली, त्याला जेऊ घातलं. यानंतर वडाळीभोई येथील रवींद्र ठोबरे, वैनतेय अहेर यांच्याशी संपर्कसाधून कपड्याची व्यवस्था केली. दरम्यान सोमा टोलच्या चमूने सूत्रे फिरवित सदर इसमाच्या नातेवाइकांचा शोध घेऊन त्यांना घटनास्थळी बोलावले. खातरजमा झाल्यानंतर वृद्धास नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. म्हातारपण त्यात अंगात ताकद नाही, पोटात अन्न नाही, अंगावर कपडा नाही आणि भाद्रपदचे तप्त ऊन अशात जास्त काळ सदर इसम रस्त्यावर पडून राहिला असता तर कदाचित अप्रिय घटना घडली असती. एका कुटुंबाने सदस्य गमावला असता. मात्र सोमा कंपनीच्या चमूने सामाजिक बांधिलकी जपत नातेवाइकांचा शोध घेतला. याबद्दल नातेवाइकांनी चमूचे आभार मानले.
टोल गस्ती पथकाची समाजसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 5:46 PM