नाशिक : राज्यातील बहुचर्चित सोनई हत्याकांडात फाशीची शिक्षा झालेला प्रकाश विश्वनाथ दरंदले (३९) याची गुरुवारी (दि़१२) रात्री अचानक प्रकृती बिघडली़ कारागृह प्रशासनाने त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याऐवजी दिरंगाई केल्याचे वृत्त आहे़ विशेष म्हणजे कारागृह प्रशासनाने कैद्याची जबाबदारी नाशिकरोड पोलिसांवर ढकलल्याने या दोघांमध्ये तू तू मैं मैं झाली व तब्बल दीड तास वाया गेला़ अखेर कारागृह प्रशासनाने रात्री उशिरा दरंदले यास रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती साधारण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़सोनई हत्याकांडात न्यायालयाने दोषी ठरविलेल्या प्रकाश दरंदले या आरोपीस फाशीची शिक्षा झालेली असून, त्याच्यासोबतच्या एका आरोपीचा पंधरा दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे़ गुरुवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास दरंदले याने छातीत वेदना होत असल्याची तक्रार कारागृह विभागाकडे केली़ मात्र, कारागृह विभागाच्या अधिकाºयांनी दरंदले यास रुग्णालयात नेण्यासाठी नाशिकरोड पोलिसांना फोन केला व रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले़ यावर नाशिकरोड पोलिसांनी आरोपी मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असल्याने त्याची जबाबदारी ही कारागृहाची असल्याचे सांगितले़ यावरून कारागृह व पोलीस या दोघांमध्ये वाद सुरू झाला व सुमारे दीड तास वाया गेला़ नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे हे अधिकारी कारागृहात गेले व शिक्षेतील आरोपी तुमच्या ताब्यात असून, त्याला उपचारार्थ दाखल करण्याची जबाबदारी तुमची आहे, असे सांगितले.
आरोपीस रुग्णालयात नेण्यास टोलवाटोलवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:35 AM